निवडून कोण येणार उत्सुकता शिगेला
By Admin | Published: May 13, 2014 02:16 AM2014-05-13T02:16:51+5:302014-05-13T02:16:51+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. निवडणुकीत सर्व प्रकारचे फंडे अवलंबले असल्याने विजय आपलाच आहे,
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. निवडणुकीत सर्व प्रकारचे फंडे अवलंबले असल्याने विजय आपलाच आहे, असा दावा करणारे उमेदवार, त्यांच्या प्रचार यंत्रणेतील कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त करीत होते. १७ एप्रिलला मतदान झाले. त्या दिवसापासून आतापर्यंत चर्चेत आणि व्हॉट्स अॅप, फेसबुकवर निवडणूक निकालाचे अंदाज, दावे व्यक्त केले जात होते. निकालाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला, तसे १६ मे रोजी नेमके काय होणार, कोण निवडून येणार, हे प्रश्न या दावेदारांच्याही मनात निर्माण होऊ लागले आहेत. निकालाच्या प्रतीक्षेतील सर्वांनाच आता उत्कंठा लागली आहे. देशात, राज्यात निवडणूक निकालाचे चित्र काय असेल याबरोबरच मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील स्थिती काय असेल, याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. निकालाच्या दिवसाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, कार्यकर्त्यांच्या डोक्यात टिक टिक वाजू लागली आहे, तर उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. निवडणुकीचा विषय चर्चेत होता. या मतदारसंघात ६०.१६ टक्के मतदान झाले, एकूण १९ लाख ५२ हजार २०८ मतदारांपैकी ११ लाख ७४ हजार ६६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (प्रतिनिधी)