चालकाच्या हाती स्टेअरिंग देण्यापूर्वी ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी कोण करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:16 IST2024-12-12T15:15:17+5:302024-12-12T15:16:06+5:30
पीएमपीएमएल प्रशासन उदासीन, अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली

चालकाच्या हाती स्टेअरिंग देण्यापूर्वी ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी कोण करणार?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) विविध आगारांमध्ये बसचालकांच्या हाती स्टेअरिंग देण्यापूर्वी चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी केली जात नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत उघड झाले. त्यामुळे दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात साधारण १७५० बसच्या माध्यमातून पीएमपीएमएलकडून सेवा दिली जाते. यात सरासरी ठेकेदारांच्या ९४१ आणि पीएमपीच्या ६५० बसगाड्यांचा समावेश आहे. पीएमपीएमएलच्या बसमधून दररोज साधारण ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई येथील बेस्ट अपघाताच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बुधवारी पीएमपीच्या निगडी आणि पिंपरी आगारांची पाहणी केली असता, दोन्ही आगारांमध्ये पीएमपीच्या कायमस्वरूपी, रोजंदारीवरील आणि ठेकेदाराकडील अशा तिन्ही प्रकारच्या चालकांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे आढळले.
केवळ हजेरी कार्डवर नोंदणी करून चालकांना मार्गांवर पाठवले जाते. अपघातानंतर प्रत्येक वेळेस नावालाच काही दिवस तपासणी होते. नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती होते. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी उदासीन आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली
कात्रजवरून जाणाऱ्या बसला डिसेंबर २०२२ मध्ये बोपदेव घाटाजवळ अपघात झाला होता. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले होते. चालकाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळले होते. त्यानंतर सर्व आगारांमध्ये चालकांकडे बस देण्याअगोदर त्याची ब्रेथ ॲनालायझरद्वारे चाचणी करूनच बसची चावी द्यावी, असे आदेश तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले होते.
त्यानंतर २३ ऑक्टोबर २०२३ मध्ये बस चालकाने सेनापती बापट रस्त्यावर आठ ते दहा वाहनांना उडवल्याची घटना घडली होती. चालक दारू पिऊन बस चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता. या प्रकरणांची गंभीर दखल घेत प्रशासनाने गॅरेज सुपरवायझर, टाइम किपर यांनी सकाळ व दुपारपाळीत चालक वाहकांना ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करून संबधित कर्मचाऱ्याची रजिस्टरवर नोंदणी करून सही घ्यावी, असे आदेश तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले होते. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके दिवसच या निर्णयाची अंमलबजावणी झाली.
पीएमपीएम एकूण बस - १९३९
स्वमालकीच्या बस - १००४
ठेकेदारांच्या बस - ९३५
ई-बस - ४९०
सीएनजी -
डिझेल - २१४
पीएमपीचे मनुष्यबळ
चालक - २९५०
वाहक - ३५००
मुंबई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पीएमपीएमएलच्या ठेकेदारांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’ तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. - सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.