थुंकणाऱ्यांवर आवर कोण घालणार ? यंत्रणांचे दुर्लक्ष; साथीच्या आजारांचे उगमस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:00 PM2020-03-13T23:00:00+5:302020-03-13T23:00:01+5:30
प्रबोधन, दंड, कारवाई, शिस्त यातून सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या थुंकणाऱ्यांवर आळा घालणे शक्य
पुणे: रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे कोणत्याही साथीच्या आजाराचे उगमस्थान, नेमके त्याकडेच सर्व संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थूंकण्याच्या सवयीकडे सामाजिक गुन्हा म्हणून पाहण्याची गरज वैद्यकीय व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
महापालिका वगळता कोणतीही सरकारी यंत्रणा याकडे गंभीरपणे पाहायला तयार नाही. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात मनुष्य बळ कमी पडत असल्याने पालिकेच्या या कामाला मर्यादा पडतात. रस्त्यावर असणाऱ्या पोलिस, वाहतूक शाखेचे पोलिस, सरकारी अधिकारी, तसेच अन्न व औषध प्रशासानाचे अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांंना याबाबतीत सरकारने विशेष अधिकार देऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीचा जागेवरच पंचनामा वगैरे करून दंड करण्याची व्यवस्था निर्माण करावी असे आरोग्य विषयात काम करणार्यांचे मत आहे.
त्यामुळे नागरिकांनीच या गंभीर विषयात स्वयंशिस्त लावून घेण्याची गरज आहे, मात्र एरवी अनेक विषयांवर कंठशोष करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यावर मात्र कधीही बोलत नाहीत. वास्तविक सर्वांनी एकत्रितपणे ठरवले तर प्रबोधन, दंड, कारवाई, शिस्त यातून सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या सवयीला आळा घालणे सहज शक्य आहे. तशी इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. त्यातून कोरोनाच काय, पण कोणत्याही साथीच्या आजाराला प्रतिबंध करता येईल.
............................
पान, गुटखा, मावा खाण्याची सवय या गोष्टींचे सेवन केले की काही वेळाने थुंकावेच लागते गाडी असेल तर गाडीवरूनच मान वाकडी करून थुंकले जाते.पायी जात असेल तरीही रस्त्याच्या कडेला थुंकले जाते.
पान टपऱ्यांच्या इथे तर दिवसभरात हजारो पिंक टाकल्या जातात.
काहीही खाण्याची सवय नसली तरीही काहीजणांना थुंकल्याशिवाय चैन पडत नाही. असे लोक कुठेही थुंकतात.
काय होते थुंकल्यामुळे
आजारी व्यक्तीच्या थुंकीतील आजार पसरवणारे जंतू मोकळे होतात. संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वासावाटे ते त्याच्या शरीरात जातात. ही प्रक्रिया एका नाही तर अनेक व्यक्तींच्या बाबतीत होते.
प्रतिकार शक्ती कमी असलेल्यांवर आधीच आजारी असलेल्यावर याचा परिणाम लगेच होतो.
जिथे थुंकले त्या परिसरातील धातू किंवा कोणत्याही वस्तूवर जंतू बसतात. त्याला कोणाचा हात लागला की ते लगेच कार्यान्वित होतात.थंड वातावरण, सावली, पाणी अशा गोष्टी जंतूंना जिवंत ठेवतात.
..........................................
काय करायला हवे.....
थुंकताना कोणीही दिसले कि ते पाहणारे त्याला प्रतिबंध.करू शकतात.थुंकणारा एकच असतो, पाहणारे अनेक, त्यामुळे प्रतिबंध करणे शक्य आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांना जागेवर आर्थिक किंवा शिक्षेच्या स्वरूपात दंड करणारी यंत्रणा निर्माण करणे, कारवाईच्या मागे कायद्याचे पाठबळ निर्माण करणे.
सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधन करणे.
-------------------
जगातील सर्वाधिक क्षयरूग्ण भारतात आहेत ते फक्त आपल्या रस्त्यावर थुंकण्याच्या सवयीमुळे. फक्त क्षयच नाही तर कोरोना सारखे आजारही थुंकी, थुंकताना, खोकताना, शिंकताना ऊडालेल्या हलक्याशा तुषारांमधूनही पसरतात व साथीच्या आजारांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे कोणत्याही ऊपायाने का होईना आपण आपली सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय घालवलीच पाहिजे. डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखा.
------------------