विद्येच्या माहेरघरात विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कोणाला संधी मिळणार? राज्यातून २७ उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 01:05 PM2023-05-06T13:05:25+5:302023-05-06T13:05:53+5:30
कुलगुरू निवड समितीमार्फत शिफारस केलेल्या २७ पैकी तब्बल ११ उमेदवार हे पुणे विद्यापीठातीलचं
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी शाेध समितीने राज्यभरातून २७ उमेदवारांच्या नावाची मुलाखतींसाठी शिफारस केली आहे. त्यात पुणे विद्यापीठातील तब्बल ११ विभागप्रमुख, तसेच प्राध्यापकांचा समावेश आहे. आयआयटी पवई येथे येत्या १८ आणि १९ मे राेजी प्राथमिक मुलाखती पार पडणार आहेत. कुलगुरू निवड प्रक्रियेला वेग आला असून, विद्यापीठाला लवकरच नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारीत कुलगुरू शाेध आणि निवड समितीची स्थापन करण्यात आली. मार्च महिन्यात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले. त्यानंतर सुमारे ९० अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यापैकी समितीकडून २७ जणांची निवड करण्यात आली आहे.
यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवड झालेल्यांमध्ये प्रा. अंजली कुरणे, प्रा. अविनाश कुंभार, प्रा. संदेश जाडकर, प्रा. संजय ढाेले, प्रा. सुरेश गाेसावी, प्रा. विजय खरे, प्रा. विलास खरात, प्रा. संजीव साेनवणे, प्रा. मनाेहर चासकर, प्रा. पराग काळकर, प्रा. राजू गच्चे या अकरा जणांचा समावेश आहे.
कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. अशोक महाजन, प्रा. बी.व्ही. पवार आणि प्रा. एम.एस. पगारे यांचाही समावेश आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उद्धव भाेसले आणि प्रा. दीपक पानसकर, मुंबई विद्यापीठातील डॉली सनी, प्रा. पी.ए. महानवर आणि प्रा. संजय देशमुख. शिवाजी विद्यापीठातील प्रा. संजय चव्हाण, प्रा. विजय फुलारी, प्रा. श्रीकृष्ण महाजन, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा. अशाेक चव्हाण, प्रा. बी.एम. मुळे, उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. धनंजय माने, नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य गणेशचंद्र शिंदे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ, लोणेरे विद्यापीठाचे प्रा. एस.बी. देवसरकर यांचीही मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे.
विद्यापीठातील प्राध्यापकांमध्ये चुरस वाढली
कुलगुरू निवड समितीमार्फत शिफारस केलेल्या २७ पैकी तब्बल ११ उमेदवार हे पुणे विद्यापीठातील आहेत. त्यामुळे विद्यापीठातीलच उमेदवाराची कुलगुरुपदी वर्णी लागते, की राज्यातील इतर विद्यापीठांतील व्यक्तीची कुलगुरुपदी निवड हाेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.