Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:31 PM2024-10-03T13:31:29+5:302024-10-03T13:32:33+5:30
पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही
पुणे : पुणे शहराला खडकवासला धरणसाखळी आणि भामा आसखेड प्रकल्पातून महापालिकेला २०३२ पर्यंत १६.३६ टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सद्य:स्थितीत २१ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेच्या सुधारित हद्दीजवळील ५ कि.मी.च्या अंतरातील ५१ गावांना पालिकेस पाणी देणे शक्य नसल्याचे पत्र महापालिका प्रशासनाकडून पीएमआरडीएला देण्यात आले आहे.
पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही. त्यात पालिकेच्या सुधारित हद्दीजवळील पाच कि.मी. हद्दीच्या ५१ गावांना पालिकेने पाणीपुरवठा करावा, असे राज्य सरकारच्या जुन्या परिपत्रकाचा आधार घेत ‘पीएमआरडीए’ने सांगितले होते. महापालिकेसाठी पाटबंधारे विभागाने २०३२ पर्यंतच्या लोकसंख्येसाठी १६.३६ टीएमसी साठा राखीव केला आहे. महापालिकेची जुनी हद्द आणि नवीन समाविष्ट गावे पाहता महापालिकेस प्रत्यक्षात २४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
२०३७ पर्यंत २६ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर, पीएमआरडीच्या टीपी स्कीमसाठीही पाणी लागणार आहे. त्यामुळे वाढीव पाणीकोटा मिळाल्याशिवाय, महापालिकेस पाणी देता येणार नाही, तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील ५ गावांसाठी पाणी योजनांचे काम सुरू असून, ते पूर्ण होण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्यांना किती पाणी लागेल, हे अद्याप निश्चित नाही, तसेच पाच कि.मी.च्या आदेशाप्रमाणे वाढीव पाणी कोटा मंजूर करून घेणे आवश्यक असल्याने कोटा मंजूर झाल्याशिवाय पाणी देता येणार नाही, असे पालिकेने पीएमआरडीएला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.