होमगार्डला गार्ड कोण करणार ? मानधन, विमा कवच, संरक्षक साहित्याचा अभाव असतानाही खांद्याला खांदा लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:36+5:302021-05-19T04:10:36+5:30
नीरा : कोरोना आपत्तीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धडपडणाऱ्या होमगार्डला गार्ड कोण करणार ? ...
नीरा : कोरोना आपत्तीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धडपडणाऱ्या होमगार्डला गार्ड कोण करणार ? असा प्रश्न हजारो होमगार्ड विचारत आहेत. शासनाचे अपुरे व तुटपुंजे मानधन, बेभरवशी काम त्यात विमाकवच नाही, तर पुरेशी संरक्षक साधने नाहीत. अशा परिस्थितीतही इमाने इतबारे काम करणाऱ्या होमगार्ड जवानांना कोरोनाची लागण झाल्यास अपुऱ्या वेतनात कोरोनाच्या उपचारांचा खर्चतरी परवडेल काय ? असा प्रश्न आता पुढे आला आहे.
वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी यामुळे पोलीस प्रशासनावरही खूप ताण असतो. आणि हा ताण थोडा का होईना कमी करण्याचे काम होमगार्ड करत असतात. मग ते ट्रॅफिक कंट्रोल करण्याचे काम असो, व्हीआयपी बंदोबस्त करण्याचे काम असो, राजकीय सभा असो, लॉकडाऊनच्या काळात जिल्हा नाकाबंदी किंवा आत्ताच्या कोरोनाच्या काळात कोविड केअर सेंटरवर सेवा देण्याचे काम असो. होमगार्ड स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुठल्याही संरक्षणाशिवाय, कुठल्याही सुविधा नसताना, पगार वेळेवर होत नसतानाही तो इमानेइतबारे कोरोना योद्धा म्हणून आघाडीवर काम करत आहे. म्हणून त्यांच्या कामाची दखल शासनाने घेतली पाहिजे. कोरोनाच्या काळातही होमगार्ड महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. परंतु होमगार्डला अत्यंत कमी मानधन दिले जाते. त्यातच ३६५ दिवस म्हणजे वर्षभर काम मिळत नाही, अवघे तीनच वर्ष सेवा देता येते. त्यातही तीन तीन महिने मानधन ही वेळेवर मिळत नाही. तसेच होमगार्डला भविष्य निर्वाह निधी, पीएफ, आरोग्यासाठी कामगार राज्य विमा योजना, ई.एस.आय, गटविमा किंवा अन्य योजना लागू करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे होमगार्डला कारागृह, खुले कारागृह रेल्वे, एसटी महामंडळ, अग्निशमन विभाग अशा विविध ठिकाणी कामे उपलब्ध करून देण्याची आज गरज आहे.
होमगार्डला कायमस्वरूपी काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना इतर वेळी रोजंदारी करावी लागते. तसेच शासन होमगार्डला कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा देत नाही, तरी ते कोरोना योद्धे म्हणून सक्षमपणे काम करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी होमगार्ड जवानांना इतर सरकारी सेवकांप्रमाणेच सर्व सोयीसुविधा द्याव्यात व होमगार्ड जवानांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात.
अजय न्हालवे, पुरंदर तालुका होमगार्ड पथक समादेशक
ब्रेक द चैन अंतर्गत पुणे, सातारा जिल्हा सीमेवर जिल्हा बंदीच्या बंदोबस्तावर कर्तव्य बजावताना होमगार्ड. (छाया : भरत निगडे)