दरवेळी नवऱ्याची अरेरावी कोण सहन करेल? लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या तब्बल ५९८ तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 01:03 PM2020-05-05T13:03:48+5:302020-05-05T13:08:32+5:30
लॉकडाऊनच्या काळात घरच्यांना वेळ देण्याऐवजी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याची उदाहरणे समोर
पुणे : स्वयंपाक करण्यास थोडा उशीर झाला, त्याने सांगितलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष करुन घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सांगण्याकडे लक्ष दिले, त्याच्या प्रोजेक्टमध्ये मदत करताना मनासारखे प्रेझेंटशन तयार न होणे, इतकेच नव्हे तर घरकामात मदत कर म्हणून म्हटल्याने इगो दुखावल्याने मारहाण करणे, शिवीगाळ करणे, घरच्यांसमोर अपमानित करणे, लॉकडाऊनच्या काळात महिलांच्या शारीरिक व मानसिक अत्याचारात वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पुणे कंट्रोलकडे तब्बल ५९८ तक्रारींची नोंद झाली असून भरोसा सेलच्या वतीने आतापर्यंत ५५ जणांना टेलिफोनिक कौन्सिलिंग करुन मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सतत काम, धावपळ, ऑफिसच्या कामाचे दडपण, वरिष्ठांच्या सुचनेची तातडीने करावी लागणारी अंमलबजावणी यासारख्या अनेक कारणांचा पाढा कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे कारण नवरोबा पत्नीला देतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात घरच्यांना वेळ देण्याऐवजी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
छोट्या छोट्या कारणांमुळे पत्नीला मारहाण करण्यापर्यंत पतीची मजल केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे म्हणाले, आमच्याकडे साधारण २० ते २५ तक्रारींची नोंद झाली आहे. यात प्रामुख्याने नव-याकडून पत्नीला शाररीक व मानसिक त्रास देण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून लोक घरात बसून आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यात चिडचिडपणा येणे स्वाभाविक आहे. परंतु त्यावर कुणाला शिवीगाळ करणे, अपमानित करणे चुकीचे आहे. पतीला वेळेवर नाश्ता न मिळाल्याने त्याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण केल्याची आमच्याकडे तक्रार आली आहे. यात पती पत्नीकडे वेगवेगळया पदार्थांची मागणी करत आहे. कामाचा ताण सहन न झाल्याने पत्नीची चिडचिड वाढली आहे. पतीला घराबाहेर पडता येत नसल्याने तसेच इतर कुणी बोलल्याने त्याचा राग घरच्या मंडळीवर काढत असल्याच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.उच्चशिक्षित मध्यम वर्गातील लोक असे वागत असतील तर काय म्हणावे? घरात सामान अस्ताव्यस्त करुन ठेवणे ते पत्नीने व्यवस्थित न ठेवल्यास तिच्या माहेरच्या व्यक्तींना दोष देणे, पत्नीने सासु सास-यांना उलट बोलणे असे प्रकार दिसून आले आहेत.
भरोसा सेलने देखील टेलिफोनिक कौन्सिलिंगच्या माध्यमातून अनेक नवरोबा, पत्नी आणि सासु सासरे यांना मार्गदर्शन केले आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ५५ तक्रारींचे समुपदेशन करण्यात आले आहे. यात सासु सासरे यांच्याकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ, नव-याची अरेरावी तसेच पत्नीने पतीला एखादे काम सांगितल्यानंतर त्याचा राग पतीला येणे, माहेरच्या माणसांना दोष देऊन त्यांच्यावरुन टोमणे मारणे असे प्रकार होत आहेत. ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यात सुशिक्षित व्यक्तींचा समावेश मोठ्या संख्येने आहे. आपआपसात सुसंवाद साधुन एकमेकांना वेळ देण्यासाठी लॉकडाऊनचा उपयोग करण्याविषयी त्यांना सांगण्यात येते. कामाचा ताण, करियर, हे सर्व कायम असून त्याशिवाय असणारे आयुष्य सकारात्मकतेने जगण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजुन घ्यावे. मुलांना वेळ द्यावा. त्यांच्याशी बोलण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो.
* कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार करायची असल्यास पोलिसांकडून मदत मिळवता येईल. फँमिली कोर्टात सध्या मुलाबाळांची कस्टडी प्रकरणे (मुलांना भेटणे, घटस्फोट प्रकरणे) सुरु आहेत. मेलमार्फत देखील तक्रार नोंदवता येणार आहे. मुळातच पती-पत्नीने आपआपसांत संवाद ठेवण्याची आवश्यकता आहे. सध्या घरकामासाठी मोलकरीण नसल्याने त्या सर्व कामाचा ताण पत्नीवर आला आहे. किरकोळ कारणावरुन वाद होत आहेत. आवडीची भाजी न बनवणे, किराणा माल खरेदीसाठी न जाणे यावरुन भांडणे होत आहे. महिलांनी पोलिसांची हेल्पलाईनचा आधार घेऊन तक्रार दाखल करावी. -अॅड. वैशाली चांदणे (अध्यक्ष-पुणे फॅमिली कोर्ट असोसिएशन)