‘ज्याचा आहे वशीला तोच जातो लसीला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:21+5:302021-08-23T04:13:21+5:30
डोर्लेवाडी: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस मिळविताना स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘ज्याचा ...
डोर्लेवाडी: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस मिळविताना स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘ज्याचा आहे वशीला तोच जातो लसीला’ असे ग्रामस्थ म्हणू लागले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांना मात्र रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. तर लस घेण्यासाठी या ठिकाणी नागरिक भल्या पहाटेपासून कामधंदा सोडून नंबरला उभे राहत आहेत, मात्र आरोग्य केंद्रावर त्यांना लस मिळत नसल्याने परत माघारी फिरावे लागत आहे.
प्राथमिक आरोग्य विभागातील डॉक्टर कर्मचाऱ्यांचे जवळचे नातलग, मित्रमंडळी तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा वशिला लावलेल्या लोकांना टोकन न घेता दिवसभर मागच्या दाराने लस मिळत आहे. हे लोक आपल्या जवळच्या लोकांसाठी अनेक टोकन घेत आहेत. मात्र, रांगेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला एकाच टोकनवर समाधान मानावे लागते. डॉक्टर आरोग्य कर्मचारी हे जवळच्या मित्रमंडळींना व नातेवाईकांना येथे लस देत आहेत. या केंद्राला येणारी लस नक्की कोणासाठी, आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी, डॉक्टरांच्या मित्रमंडळीसाठी, स्थानिक पुढाऱ्यांना, का सामान्य नागरिकांसाठी अशी जोरदार चर्चा येथील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. तसेच या केंद्रात सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना नियमांची ढाल बनवून दीड ते दोन तास राखून ठेवले जात आहे. मात्र दुसऱ्या दाराने ओळखीच्या व त्यांच्याही नातेवाइकांना डोस देण्याचे काम राजरोस सुरू आहे.
-----------------------
याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता त्यानांही उलटसुलट उत्तरे दिली व तुमचा या लसीकरणामध्ये काही संबंध नाही. तसेच आमची रेकॉर्ड चेक करण्याचा येथील कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे नक्की वैद्यकीय आरोग्य केंद्रात चालले तरी आहे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
-----------------------------
प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असून देखील ती नागरिकांना दिली जात नाही, याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी डॉक्टरांना, कर्मचाऱ्यांना लसीसंदर्भात विचारले असता त्यांच्याकडून नागरिकांशी व्यवस्थित बोलले जात नाही त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे सोडून त्यांना अरेरावेची भाषा वापरली जात आहे. लसीचा डोस फोडला असता त्यांना लागणारे १० लोकही तुम्हीच शोधून आणा असा प्रकार याठिकाणी घडत आहे. या प्रथामिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर व कर्मचारी हे गावगुंड असल्याचा आरोप येथिल नागरिकांनी केला आहे.
- गणेश खोत,
ग्रामस्थ डोर्लेवाडी (ता. बारामती)
प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी प्रतीक्षेत असलेले ग्रामस्थ.
२२०८२०२१-बारामती-११