Video: कसब्यात 'ते' बॅनर कुणी लावले लवकरच सर्वांसमोर येईल; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 07:41 PM2023-02-15T19:41:29+5:302023-02-15T19:41:47+5:30
सरसकट ब्राह्मण समाजात नाराजी आहे असे म्हणणे चुकीचे
पुणे/किरण शिंदे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही भागात ब्राह्मण समाज नाराज असल्याचे बॅनर लागले होते. ब्राह्मण समाजावर अन्याय होत असल्याची भावना या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली होती. इतकेच नाही तर यावेळी ब्राह्मण समाज नोटाला मतदान करणार असल्याचेही या बॅनरच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. त्यामुळे या बॅनरची मोठी चर्चा पुण्यात रंगली होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून आता मोठा खुलासा केला आहे. ते बॅनर कोणी लावले हे लवकरच सर्वांसमोर येईल असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आज खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ब्राह्मण उमेदवार दिला नसल्यामुळे काही प्रमाणात नाराजी असू शकते. पण सरसकट ब्राह्मण समाजात नाराजी आहे असे म्हणणे चुकीचे आहे. ब्राह्मण समाज इतका संकुचित विचार कधीच करू शकत नाही. काही लोकांमध्ये नाराजी आहे ती आम्ही दूर करू. पुणे शहरात काही ठिकाणी ब्राह्मण समाज नाराज असल्याचे बॅनर लावले होते. मात्र हे बॅनर ब्राह्मण समाजाने लावले नाही.. हे बॅनर कोणी लावले होते हे लवकरच सर्वांसमोर येईल.