पाऊस पुणेकरांची पाठ साेडेना ! संपूर्ण आठवडा पावसाचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 11:58 AM2019-11-01T11:58:19+5:302019-11-01T12:00:50+5:30
संपूर्ण ऑक्टाेबर महिना पावसाळी गेल्यानंतर आता नाेव्हेंबरचा पहिला आठवडा देखील पावसाचाच असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.
पुणे : संपूर्ण ऑक्टाेबर महिन्यात शहरात पावसाने हजेरी लावलेली असताना आता नाेव्हेंबरचा पहिला आठवडा देखील पावसाचाच असणार आहे. या संपूर्ण आठवड्यात पुण्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस शहरात हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचे नेमकं काय ठरलंय असा सवाल आता पुणेकर उपस्थित करत आहेत.
ऑक्टाेबर महिन्यात शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबिल ओढ्याला पूर आल्याने टांगेवाली काॅलनी येथील अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तसेच शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचून अनेकांचा मृत्यू झाला. दिवाळीत देखील शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यंदा पुणेकरांना दिवाळी देखील पावसातच साजरी करावी लागली. आता नाेव्हेंबरचा पहिला आठवडा देखील पावसातच घालवावा लागणार आहे. 7 नाेव्हेंबर पर्यंत शहरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हाेण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच राज्याच्या विविध भागांमध्ये देखील पाऊस हाेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे उभं राहिलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान लक्षद्वीप आणि लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर ‘महा’ हे चक्रीवादळ तयार झाले आहे. पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर ‘कयार’ हे चक्रीवादळ अजूनही कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडत आहे.