शाळेत कुणाचे अफेअर, आवडीची कोण? गॉसिपिंगसाठी सोशल मीडिया अकाउंट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:53 AM2023-10-13T09:53:52+5:302023-10-13T09:54:23+5:30
सध्या अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे चित्र आहे...
- नम्रता फडणीस
पुणे : शहरातील एका नामवंत खासगी शाळेतील इयत्ता दहावीच्या मुलांनी शाळेत कोणत्या मुला-मुलीचे अफेअर आहे. कुणाला कोण आवडते याच्या गॉसिपिंगसाठी सोशल मीडियावर अकाउंट ओपन केले. तेही शाळेच्या नावाने. त्यात बिनधास्तपणे मुला-मुलींबद्दल गॉसिपिंग सुरू होते. शाळेतल्याच एका हुशार विद्यार्थ्याने सोशल मीडियावर अकाउंट सुरु केलेल्या मुलाच्या मोबाइल क्रमाकांच्या शेवटच्या क्रमांकाचे तीन डिजिट मिळवित ते आपल्या मोबाइलच्या संपर्क क्रमांकाच्या यादीत टाकून सर्च केले असता त्यातील एक क्रमांक मॅच झाला. त्यातून अकाउंट सुरू केलेल्या विद्यार्थ्यांचा छडा लागला.
सध्या अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स किंवा शॉर्ट्स टाकून प्रसिद्धी मिळवता येते ही मानसिकता शाळकरी मुलांमध्ये तयार झाली आहे. मात्र, सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या शाळकरी मुला-मुलींना भविष्यातील दुष्परिणामांची जराही जाणीव नसते. मुलांसह पालकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पालकांनो सावधान! आता मोबाइलमध्ये गेम खेळण्यापुरतेच मुला-मुलींचे व्यसन मर्यादित राहिलेले नाही, तर सोशल मीडियावर अकाउंट उघडून कौटुंबिक माहिती देण्याबरोबरच गेमिंग आणि चॅटिंगच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी मैत्री वाढविणे, गाॅसिपिंगसाठी अकाउंट ओपन करणे, रील्स आणि शॉर्ट्स प्रसिद्ध करून लाइक्स आणि व्ह्यूज मिळविणे इथपर्यंत मुले पोहोचली आहेत. 'सोशल मीडिया हे एक मायाजाल आहे. त्याचा योग्य वापर न केल्यास संभाव्य धोक्याची मुलांना कल्पनाही नसते. या निरागस वयात स्वतःचे चांगले-वाईट समजण्याची त्यांची क्षमता नाही. त्यामुळे पालकांनी अधिक जागरूक राहायला हवे अशी अपेक्षा सायबर वकिलांनी व्यक्त केली आहे.
तुम्हाला माहितीये का? सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी १८ वर्षांची वयोमर्यादा आहे. मात्र, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) ने केलेल्या अभ्यास पाहणीतून दहा ते सतरा वर्षे वयोगटातील जवळपास ४२.९ टक्के मुला-मुलींची सोशल मीडियावर अकाउंट आहेत, त्यात दहा वर्षांच्या आतील ३७.८ टक्के मुला-मुलींची फेसबुकवर, तर २४.३ टक्के मुला-मुलींची इन्स्टाग्रामवर अकाउंट आहेत.
समाज माध्यमांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स, शॉर्ट्स प्रसिद्ध करून प्रसिद्धी मिळवता येते असा समज तरुणांसोबतच शाळकरी मुलांचाही झाला आहे. मी गुन्हेगार, मी बादशाह, मी भाई, मी डॉन, मी, असा आशय असणारे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातात. यामध्ये तरुणांपेक्षा शाळकरी मुलांचा समावेश अधिक असल्याचे आढळून येत आहे.
...याला शाळकरी मुले पडतात बळी-
गुन्हेगारांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र कारागृहात गेल्यानंतर गुन्हेगाराच्या भेटीबरोबरचा व्हिडीओ काढतात. त्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. एखादा गुन्हा केला की प्रसिद्धी मिळते. गुन्हेगाराच्या अवतीभोवती तरुण फिरताना दिसतात. त्यांना भाई म्हणून हाक मारतात. याची भुरळ शाळकरी मुलांना पडते आणि ते गुन्हेगारीकडे ओढले जातात.
सोशल मीडियाचे नियम सांगण्याबरोबरच मुलांना हे माध्यम कसे जबाबदारीने हाताळायचे याची जाणीव करून द्यायला हवी. पालकांनीही मुलांना संवाद साधण्यासाठी साध्या कीपॅडचे फोन द्यावेत. सध्याच्या काळात मुलांना मोबाइल कसा वापरायचा हे पूर्णत: माहिती आहे. पालकच मुलांना लाॅक कसे उघडायचे हे विचारतात. शाळेसह पालकांनी मुलांना विचारायला पाहिजे की तुमची सोशल मीडियावर अकाउंट आहेत का? असतील तर त्यांना ती डिलीट करायला सांगावे. मुलांना इतर गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते तसे सोशल मीडियाबाबतही शिक्षण द्यायला हवे.
- ॲड. गौरव जाचक, सायबर वकील