महापालिकेतल्या ‘तीन तिघाडी’ने कोणाची ‘बिघाडी’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:50+5:302021-09-23T04:13:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेत प्रभाग किती सदस्यांचा ...

Whose 'Bighadi' is the 'Three Tighadi' in the Municipal Corporation? | महापालिकेतल्या ‘तीन तिघाडी’ने कोणाची ‘बिघाडी’?

महापालिकेतल्या ‘तीन तिघाडी’ने कोणाची ‘बिघाडी’?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेत प्रभाग किती सदस्यांचा याची उत्सुकता होती. पुणे महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढवली जाण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर याचा लाभ कोणाला याची चर्चा सुुरू झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोघांनी ‘आगामी महापौर आमचाच’ असा विश्वास व्यक्त केला आहे. कॉंग्रेसमध्ये मात्र मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने एकचा प्रभाग गृहीत धरून प्रभाग रचना करण्याचे काम सुरू केले होते. यामुळे सर्वच पक्षांची धास्ती वाढली होती. एक प्रभाग रचना ठेवली असती तर महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचे पत्ता कापला गेला असता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पुण्यात द्विसदस्यी प्रभाग पद्धतीचे सूतोवाच केले होते. सन २०१७ च्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेत पहिल्यांदाच पुण्याची महापालिका जिंकली होती. मात्र, आता ‘ना भाजपाच्या मनासारखे, ना राष्ट्रवादीच्या मना’सारखे असे झाल्याने निवडणुकीतली चुरस वाढली आहे.

कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की, गुरुवारी प्रदेश कार्यकारिणीची मुंबईत बैठक आहे. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. याआधीच्या भाजपा सरकारने चार सदस्यांचा प्रभाग केला. त्यात त्यांचे राजकारण साधले; मात्र शहर विकासाची वाट लागली. त्यामुळे एक किंवा दोन सदस्यांचा प्रभाग करावा, अशी मागणी काँग्रेस सरकारला करणार आहे. कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी सांगितले, “महाआघाडी सरकारने वेळीच प्रभाग रचनेचा निर्णय घेतल्याने आभार मानतो. या निवडणुकीतही तिन्ही पक्षांची आघाडी झाली तर तिघांना एक-एक जागा मिळेल.”

चौकट

प्रभाग कितीचाही असो

“अजित पवार नेहमीच कार्यकर्त्यांना सांगतात, प्रभाग रचना कशी झाली तरी प्रत्येकाची निवडून येण्याची ताकद असली पाहिजे. त्यामुळे प्रभाग रचना एकची होवो की, दोन-तीनची; पण यावेळी पुणे महापालिकेत ‘राष्ट्रवादी’चीच सत्ता येऊन आमचाच महापौर होणार याबाबत काही शंका नाही. पुणेकरांनी भाजपचा कारभार पाहिला आहे आणि आमची तयारी पूर्ण झाली आहे. पुणेकर आम्हालाच निवडून देतील.”

- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

चौकट

पुणेकरांचा विश्वास आमच्यावर

“हा निर्णय घ्यायला राज्य सरकारने उशीरच केला. सत्तेतल्या तिन्ही पक्षांत कुठल्याही विषयात एकवाक्यता नसल्याने ही दिरंगाई अपेक्षित होती. पुण्यात प्रभाग कितीचा आणि कसाही झाला तरी पुणेकरांचा कौल भाजपलाच मिळेल असा ठाम विश्वास आहे. पाच वर्षांपूर्वी पुणेकरांनी टाकलेला विश्वास मेट्रो, भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, पुणे विकास आराखडा, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण आदींमधून आम्ही सार्थ ठरवला आहे.”

- जगदीश मुळीक, भाजप शहराध्यक्ष

चौकट

शिवसेनेशिवाय महापौर नाही

“शासनाने चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द केली हे खूप चांगले झाले. चारच्या प्रभाग रचनेत भाजप सोडून सर्वांची प्रचंड वाताहत झाली होती. आता तीनचा प्रभाग झाला आहे. यात कोणी कितीही दावे केले तरी शिवसेनेच्या मदतीशिवाय महापालिकेत कोणाचीच सत्ता येऊ शकत नाही आणि कोणाचाच महापौरही होणे कठीण आहे.”

- संजय मोरे, शिवसेना शहराध्यक्ष

चौकट

लढणारा योद्धा पाहिजे

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा संघर्षातून उभा राहिलेला पक्ष आहे. राज ठाकरे नेहमीच सांगतात, मैदान कसेही असो लढणारा योद्धा पाहिजे. मनसेची पूर्ण तयारी झाली आहे. आघाडी, युतीबाबत वरिष्ठ पातळीवर काहीही निर्णय होऊ द्या, मनसे पूर्ण ताकदीने लढणार.”

-वसंत मोरे, मनसे शहराध्यक्ष

Web Title: Whose 'Bighadi' is the 'Three Tighadi' in the Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.