काेणाच्या आशीर्वादाने सुरु ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्री? प्रोटेक्शन मनी ५० ते ६० हजारांचा रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:59 IST2024-12-05T13:57:53+5:302024-12-05T13:59:26+5:30
शहरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे

काेणाच्या आशीर्वादाने सुरु ‘स्पा’च्या नावाखाली देहविक्री? प्रोटेक्शन मनी ५० ते ६० हजारांचा रेट
पुणे: ऐतिहासिक शहर, सुसंस्कृत लोकांचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हळूहळू पब, स्पा, पोर्शे आणि ड्रग्ज रॅकेटचे केंद्र या नावाने ओळखले जात आहे. गेल्या २ वर्षांमध्ये शहरात घडलेल्या घडामोडी पाहता या अवैध धंद्यांवर पर्मनंट उपाय करणे गरजेचे झाले आहे.
शहरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने मंगळवारी बाणेर परिसरातील एका ‘स्पा’वर कारवाई करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. मात्र, शहरात सर्वत्रच असे प्रकार सुरू असल्याने या ‘स्पा’ चालकांना कुणाचे ‘प्रोटेक्शन’ आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या कारवाईचा मोर्चा ‘स्पा’च्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाकडे वळवला आहे. गुन्हे शाखेला त्यांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस आयुक्तांनी तर थेट, एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने रेड (कारवाई) केली, तर संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराला जबाबदार धरले जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही असे प्रकार विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राजरोस सुरू असल्याचे दिसून येते. मात्र, प्रोटेक्शन मनी म्हणून ५० ते ६० हजार रुपये ‘स्पा’ चालकांकडून घेणारे रॅकेट कुणाच्या आशीर्वादाने कार्यरत आहे, हे देखील समोर येणे गरजेचे आहे.