यंदा लोकसभेवर कोणाचा झेंडा फडकणार; पुणेकरांना अपेक्षा रंगतदार लढतीची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 01:41 PM2024-03-17T13:41:33+5:302024-03-17T13:42:09+5:30
धंगेकर, जोशी, बागुल, गायकवाड आणि मोरेंच्या नावाची चर्चा, भाजपच्या मोहोळ यांना लढत देण्यासाठी आघाडीच्या कोणाला संधी मिळणार?
पुणे : काँग्रेसच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची बैठक १८ मार्चला दिल्लीत होत आहे. त्यामध्ये पुणे शहर लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, उमेदवार जाहीर नसला तरीही काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसकडून कसब्याचे बहुचर्चित आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी नगरसेवक आबा बागुल, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती. आता त्यात मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांच्याही नावाची भर पडली आहे. दुसरीकडे भाजपने माजी महापाैर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. यामुळे पुणे लोकसभेसाठी नेमकी कुणाची वर्णी लागणार? याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांसह पुणेकरांची उत्सुकता ताणली गेली आहे.
मोरेंचे गणित
वसंत मोरे यांनी आपल्याला लोकसभानिवडणूक लढवायची व जिंकायची आहे, असे मनसेत असतानाच जाहीर केले होते. मनसेचा पहिला खासदार आपण पुण्यातून देणार, असा आवाजच त्यांनी त्यावेळी दिला. यानंतर सोशल मीडियावरील त्यांच्या समर्थकांनी भावी खासदार म्हणून त्यांचे फलक ठिकठिकाणी झळकवले. पण मनसेच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे मतभेद समोर आले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे चुकीचा अहवाल पाठवला. त्यात मनसेला पुण्यात यश मिळणार नाही, असे सांगितले गेले, असा आरोप करत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला. त्याचवेळी काँग्रेसकडून लगेचच त्यांची भेट घेण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)कडून मान्यतेची शक्यता कमी
काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी नगरसेवक आबा बागुल, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती. आता त्यात मोरे यांच्याही नावाची भर पडली आहे. मोरे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही भेट घेतली आहे. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने शरद पवार त्यांना मान्यता देतील, असे दिसत नाही.
काँग्रेसमध्ये दोन प्रवाह
काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना त्यांनी काँग्रेसकडून उभे राहावे, असे वाटते. मोरे यांचे सोशल मीडियावर काही लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी पक्ष सोडला तर त्याची चर्चा राज्यभर झाली. समर्थक कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी शहरात तयार केली आहे. ती फळी त्यांच्या मागे उभी राहील, शिवाय काँग्रेसची जी काही पारंपरिक मतपेढी आहे, त्याचाही उपयोग होईल, असे मोरे काँग्रेसकडून उभे राहावे असे वाटणाऱ्या स्थानिक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
अपक्ष म्हणूनही चर्चा
मोरे अपक्ष म्हणून उभे राहिले तर त्याचा काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा होईल, असेही काही राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यांची सर्व कारकीर्द मनसेतील आहे. मनसे हिंदुत्ववादी धोरणातील आहे. त्यामुळे मोरे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची मते घेतील व त्याचा काँग्रेसला फायदा होईल. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवायचीच असेल तर लढवू द्यावी, असेही काहीजणांचे मत आहे. त्यांची बंडखोरी भाजप उमेदवाराला तोट्याची तर काँग्रेसच्या अधिकृत उमदेवाराला फायद्याची ठरेल, असे गणित मांडले जात आहे.
पुराणवृक्ष, हलला तरी खळबळ
आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरीही काँग्रेसची शहरातील संघटना व नेतेही अजून सूस्तच आहेत. उमेदवार जाहीर नसल्याने त्यांची अडचण झाली हे खरे असले, तरी पक्ष म्हणून निवडणुकीच्या अनुषंगाने काहीच हालचाल व्हायला तयार नाही. काँग्रेस हा पुराणवृक्ष आहे. तो फक्त हलला तरी खळबळ होते. त्यामुळे निवडणूक कशी हाताळायची हे काँग्रेसला बरोबर कळते, त्याविषयी अन्य कोणी सांगू नये, असे समर्थन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केले जाते.