शहरातील पदपथ कोणासाठी?
By admin | Published: April 2, 2017 02:49 AM2017-04-02T02:49:44+5:302017-04-02T02:49:44+5:30
नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून पदपथ बनविले आहेत. मात्र आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते वाल्हेकरवाडी मार्गावरील
रावेत : नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून पदपथ बनविले आहेत. मात्र आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते वाल्हेकरवाडी मार्गावरील चिंचवडे नगरला जोडणाऱ्या संत नामदेव चौक येथील प्रमुख पदपथावर ठेकेदाराने गेल्या अनेक महिन्यापासून ठेवलेले लोखंडी पाईप, पडलेला राडारोडा, पत्र्याचे उभारलेले शेड आदींचे साम्राज्य असल्यामुळे नागरिकांनी चालायचे कोठून हा प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथ असून, अडचण नसून खोळंबा या म्हणीप्रमाणे परिस्थिती बनली आहे. त्यामुळे शाळकरी मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रमुख रस्त्यावरून चालावे लागत आहे.
परिसरातील प्रमुख रस्त्यावर रहिवाशांना सहजगत्या ये-जा करण्यासाठी पदपथ तयार करण्यात आले. यासाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जातात. या पदपथांचा वापर वाहनतळ, बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी उपयोग होत आहे. येथे नागरिकांना चालता येत नाही. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी रस्ता वाहनांच्या गदीर्ने तुडुंब भरला जातो. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना आपल्या हक्काच्या पदपथांवरून चालणेही कठीण बनले आहे. ठेकेदार मात्र कामासाठी व साहित्य ठेवण्यासाठी याचा वापर करीत आहेत
परिसरातुन हिंजवडीकडे पाण्याची नवीन पाईप लाईन कामासाठी काही महिन्यांपासून परिसरातील प्रमुख रस्त्यावर खोदकाम करून ठेवले आहे. बहुतांश ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. मात्र पदपथांची व रस्त्याची दुर्दशा जैसे थे आहे. या कामासाठी ठेकेदाराला किती कालावधी दिला होता, त्या कालावधीत काम पूर्ण का झाले नाही, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
केवळ पाईप ठेवले आहेत, असे नाही तर इतर साहित्य ठेवण्यासाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूवरील पदपथावर पत्र्याचे शेड मारले आहे. तसेच परिसरातील कचरा एकत्रित करण्यासाठी तीन मोठ्या कचरा कुंडी रस्त्या लगत मांडल्यामुळे नागरिकांना पदपथा वरून चालता येत नाही आणि कचरा कुंड्या रस्त्याच्या कडेला असल्यामुळे रस्त्यावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते त्यातच चाफेकर चौक ते जुना जकात नाका या मार्गाच्या सिमेंट रस्त्याचे काम चालू असल्यामुळे वाहतूक नामदेव चौकातून वळविण्यात आली आह
त्यामुळे येथे सतत वाहतुकीची गर्दी असते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शाळकरी मुलांना पदपथाऐवजी रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते. रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत.एकतर काम मिळेल की नाही ही मोठी चिंता कामगारांना असते. सकाळच्या वेळी घरातील कामे आवरून कामावर जाण्याची घाई, त्यामध्ये रस्ता पार करण्याची मोठी कसरत करावी लागते.
या कसरतीमध्ये मजुरांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. प्रमुख रस्त्याने वाहने भरधाव वेगाने धावतात. अनेक वेळा रस्त्यावर अपघात झाले आहेत. यासाठी प्रशासनाने नागरिकांसाठी योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या
पाहिजेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे गरजेचे आहे.अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)