...यामध्ये कोणाचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:59+5:302021-04-21T04:10:59+5:30

मनसे नेत्यांचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर बारामती : बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने आमच्याशी संपर्क साधत होते. याबाबत ...

... Whose insult in this | ...यामध्ये कोणाचा अवमान

...यामध्ये कोणाचा अवमान

Next

मनसे नेत्यांचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

बारामती : बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने आमच्याशी संपर्क साधत होते. याबाबत प्रशासन अधिकाऱ्यांनी देखील आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली. अजितदादांना राज्याचा व्याप असल्याने त्यांना संपर्क करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होत नव्हता. त्यामुळे घटनात्मक प्रमुख म्हणून कोरोनाबाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यपालांना पत्र पाठविले. यामध्ये कोणाचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही,तो हेतूदेखील नव्हता, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी दिले आहे.

अ‍ॅड. पाटसकर यांनी बारामती शहरातील कोरोना रुग्णांना जाणवणारा बेड आणि व्हेंटिलेटर, रेमडेसिविरच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांना बारामतीत लक्ष घालण्याची मागणी केली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ही मागणी म्हणजे बारामतीचे नाव खराब करण्याचा प्रकार असल्याचा टोला मनसे नेत्यांना लगावला आहे. त्यावर आज पाटसकर यांच्यासह नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक सुनील सस्ते यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

अ‍ॅड. पाटसकर म्हणाले, रेमडेसिविर देताना जवळच्या बगलबच्च्यांना प्राधान्य दिले जात होते. त्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नव्हते. अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करुन देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न म्हणून राज्यपालांना संपर्क साधला. यामध्ये पवार, बारामतीला बदनाम करण्याचा कोणताही हेतू नव्हता. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, कोविड उपचार केंद्रांमध्ये समन्वय साधावा,यामध्ये आलेला विस्कळीतपणा दूर करण्याची गरज आहे. सामाजिक काम करुन खांदे दुखत असतील तर आता आमच्या खांद्यावर भार द्यावा, असा टोला पाटसकर यांनी लगावला.

नगरसेवक सस्ते म्हणाले, शहरातील लोकसंख्या पाहता मतदान केंद्राप्रमाणे लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी आपण प्रशासनाकडे केली होती. या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारले. मात्र, त्या सर्वांवर एका व्यक्तीचे ‘प्रेशर’ होते. त्यामुळे माझ्या मागणीची दखल घेतली जात नव्हती. माझी मागणी कोणत्या पक्षाची नाही,बारामतीकरांसाठी केलेली ही मागणी आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ढोल आंदोलनाचा पर्याय निवडावा लागला. त्यानंतर माझ्या पत्राची दखल घेण्यात आली. आता येथील शाळा धुऊन स्वच्छ करण्यात आली आहे. येथे लसीकरण केंद्र निर्मिती च्या दिशेने पावले पडली आहेत.

...सुसज्ज कोविड केअर

सेंटर उभारणार

प्रांताधिकाऱ्यांकडे कोविड उपचार केंद्रासाठी जागेची मागणी करण्यात आली आहे.लवकरच कोरोनाबाधित रुग्णांसाठी आमच्या भागात सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल.यामध्ये श्रीमंत बाबुजी नाईक मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह अ‍ॅड. सुधीर पाटसकर यांची सामाजिक संस्था, मनसे कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार असल्याचे नगरसेवक सुनील सस्ते यांनी सांगितले.

Web Title: ... Whose insult in this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.