पुणे जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:31 AM2024-12-04T10:31:19+5:302024-12-04T10:33:35+5:30
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील २१ पैकी १८ आमदार महायुतीचे, तर दोन आमदार महाविकास आघाडीचे आणि १ अपक्ष आमदार विजयी झाले.
पुणे : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मुंबईत गुरुवारी (दि. ५) सायंकाळी ५ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात काेणा-काेणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
त्यात बारामतीमधून निवडून आलेले अजित पवार, आंबेगाव येथून निवडून आलेले दिलीप वळसे-पाटील, कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहे तसेच राज्यमंत्रिपदासाठी पर्वती मतदारसंघाच्या माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंटचे सुनील कांबळे, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा आहे. शिंदेसेनेचे पुरंदरमधून निवडून आलेले विजय शिवतारे यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील २१ पैकी १८ आमदार महायुतीचे, तर दोन आमदार महाविकास आघाडीचे आणि १ अपक्ष आमदार विजयी झाले आहे. महायुती सरकारमध्ये अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप वळसे-पाटील, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके यांचे नावही चर्चेत आहे.
भाजपच्या कोट्यातून चंद्रकांत पाटील हे पुन्हा मंत्री होणार आहेत. त्याचबरोबर पर्वतीच्या माधुरी मिसाळ, दौंडचे राहुल कुल, भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रिपदावर वर्णी लागण्याची चर्चा आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असून तेथे दुसऱ्यांदा विजयी झालेल्या सुनील कांबळे यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.