उरुळी कांचन पोलिसांनी पकडलेला तांदूळ कुणाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:07+5:302021-07-30T04:11:07+5:30
उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या उरुळी कांचन पोलीस दूर क्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय ...
उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या उरुळी कांचन पोलीस दूर क्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणारा पुण्यातील रावेत, कासारवाडी व दापोडी येथून ५० किलो वजनाच्या ६० गोण्या म्हणजे सुमारे तीन टन तांदूळ घेऊन निघालेला टेंपो पकडला असून, हा माल नेमका रेशनचा आहे की खाजगी दुकानदाराचा आहे याची खात्री होत नसल्यामुळे एक वेगळीच शंका उत्पन्न झाली आहे?
हा माल केडगाव येथील एका हमालवजा दुकानदाराकडे घेऊन निघाल्याचे टेम्पोचालकाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सुमारे एक लाख किमतीचा तांदूळ व सुमारे सात लाख किमतीचा टेम्पो असा एकूण आठ लाख किमतीचा माल ताब्यात घेतला आहे. मात्र, लाल फितीच्या कारभारात नेमका हा रेशनच्या तांदळाचा काळाबाजार आहे की आणखी काही याबाबत योग्य चित्र शासकीय कार्यालयांच्या वेळकाढूपणामुळे समोर येत नाही. याबाबत पत्रकारांनी जिल्हा व तालुका पुरवठा अधिकारी कार्यालय पुणे यांचेशी संपर्क केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. उलट या मालाच्या खरेदी पावत्या गोळा करण्याचे काम चालू असून त्या सादर करून हा तांदूळ जरी दोन नंबरचा असला तरी तो एक नंबरचा आहे हे दाखविण्यासाठी ‘अर्थपूर्ण’ घडामोडी सुरु झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक २६ जुलै २०२१ रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास हा माल घेऊन चाललेला टेम्पो (एमएच १२, एसएक्स ००३७) उरुळी कांचन येथे रात्रीची गस्त घालणाऱ्या बीट मार्शलच्या निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी तो अडवून चालकाकडे या मालाबद्दलची चौकशी केली असता चालक अचूक माहिती देऊ न शकल्याने त्यांनी तो टेम्पो मालासहित ताब्यात घेऊन उरुळी कांचन पोलीस दूर क्षेत्रांमध्ये नेऊन ठेवला व तहसील कार्यालयाकडे याबाबतची विचारणा केली असता त्यांनीही याबाबत काही सांगू शकत नाही, असे उत्तर देत हा चेंडू अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या कोर्टात टोलवला. पोलिसांनी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे चौकशी करण्यास सांगितले त्या नुसार पोलिसांनी अन्नधान्य वितरण विभाग कार्यालयाकडे व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय पुणे यांचेशी संपर्क साधून यामाला बद्दलची चौकशी करून खुलासा मागवला आहे, अन्नधान्य वितरण कार्यालयाने आम्ही स्वतः येऊन पाहणी करून याबाबतचा खुलासा करू असे सांगितले, मात्र आज दिनांक २८ जुलै २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कार्यालयातील कोणीही कर्मचारी या मालाची खात्री करून घेण्यासाठी उपस्थित झाला नसल्याने या वेळकाढूपणामुळे हा माल नेमका शासकीय की खाजगी? या शंकेला पुष्टी मिळत आहे.
--
यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्हाला या तांदळाच्या बाबतीत शासकीय अधिकाऱ्याकडून योग्य तो खुलासा प्राप्त होत नाही तोपर्यंत हा टेम्पो व त्यातील माल आम्ही पोलिस चौकीमध्ये जप्त करून ठेवलेला आहे तो सोडणार नाही.
-दादाराजे पवार,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, उरुळी कांचन