कोणाचे शिर्डीच्या साईबाबाला तर कोणाचे देवभावराच्या देवीला नवस; मतदारांचे असेही प्रेम... !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 06:19 PM2022-12-25T18:19:30+5:302022-12-25T18:19:44+5:30
नेत्यांवरील प्रेमापोटी लोक काहीही करायला तयार असतात
सोमेश्वरनगर : अनेक ठिकाणी आपण राजकीय नेत्यांवरील लोकांचे प्रेम पाहिले आहे. नेत्यांवरील प्रेमापोटी लोक काहीही करायला तयार असतात. असाच एक अनुभव नुकताच आला आहे. नुकत्याच बारामती तालुक्यातील वाणेवाडी ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. यामध्ये गाव पॅनेलच्या विरोधात उभ्या असलेल्या गितांजली दिग्विजय जगताप ह्या सरपंचपदाला उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्यावरील असलेले निखळ प्रेम मतमोजणी दिवशी संपूर्ण गावाने अनुभवले. जगताप या निवडून याव्यात म्हणून कोणी शिर्डीच्या साईबाबाला नवस बोलले, कोणी शिरूरच्या देवभावराच्या देवीला नवस बोलले, कोणी मारुतीला पेढ्याचे नवस बोलले, कोणी सोमेश्वरला जेवणाची पंगत घालण्याचा नवस बोलले काही महिला मतदारांनी तर मतमोजणी दिवशी चक्क देवच पाण्यात घातले.
वाणेवाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड नंबर ३ मळशी-दत्तवाडी व वार्ड नंबर ५ विकासनगर-रामनगर या भागातील मतदारांनी हे नवस बोलले होते. यातील दोन मतदारांचे मारुतीला बोललेला पेढ्यांचा नवस पूर्ण केला असून लवकरच सरपंच गितांजली जगताप व त्यांचे पती दिग्विजय जगताप हे जोडीने मतदारांसह राहिलेले नवस पूर्ण करणार आहेत. वाणेवाडी (ता. बारामती) येथे गावकारभाऱ्यांनी एकत्र येत उभारलेल्या पॅनेलला अपक्ष उमेदवारांनी जोरदार धक्का दिला. गावकरी पॅनेलच्या विद्या सुनिल भोसले यांचा अपक्ष उमेदवार गीतांजली दिग्विजय जगताप यांनी तब्बल ४०३ मतांनी पराभव केला. तेरापैकी नऊ सदस्यांचे बहुमत गावकरी पॅनेलच्या पदरात पडले आहे. तर मतदारांनी चार अपक्षांनाही निवडून दिले आहे.
वाणेवाडी ग्रामपंचायतीला बिनविरोध निवडणुकीची परंपरा असली तरी यावेळी त्यात यश आले नाही. गावकारभाऱ्यांच्या हनुमान ग्रामविकास पॅनेलकडून सोमेश्वर काऱखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माजी संचालक किशोर भोसले, राष्ट्रवादी युवकचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, उद्योजक सुनिल भोसले व राजेंद्र जगताप, प्रवीण भोसले अशा मातब्बरांची ताकद होती. या पॅनेलने विद्या सुनिल भोसले यांना सरपंचपदाची उमेदवारी जाहीर केली. माजी सरपंच दिग्विजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली अपक्ष उमेदवार गितांजली जगताप यांनी कडवे आव्हान दिले. टप्प्याटप्प्याने गावकऱ्यांच्या हातून निवडणूक मतदारांच्या हातात गेली आणि सरपंचपद निसटत गेले. दुरंगी लढतीत पहिल्या प्रभागात विद्या भोसले यांनी मोठी आघाडी घेतली. मात्र उर्वरीत चारही प्रभागात गितांजली जगताप यांनी निर्णायक मते प्राप्त केली.