गणेश विसर्जनासाठी दीडशे ‘फिरते हौद’ कशासाठी? पुणे महापालिकेकडून सव्वा कोटींचा चुराडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:44 PM2022-08-23T14:44:16+5:302022-08-23T14:44:40+5:30
यंदा कुठलेही निर्बंध नसताना व नदी घाटावरील हैाद टाक्या तसेच मुबलक विसर्जन व्यवस्था असतानाही, प्रशासनाने दीडशे फिरत्या हौदाची निविदा काढली
पुणे : कोरोना आपत्तीत गर्दी होऊ नये म्हणून गणेश विसर्जनासाठी फिरते हौद उपलब्ध करून दिले होते. परंतु, यंदा कुठलेही निर्बंध नसताना व नदी घाटावरील हैाद टाक्या तसेच मुबलक विसर्जन व्यवस्था असतानाही, प्रशासनाने दीडशे फिरत्या हौदाची निविदा काढली आहे. यावर सजग नागरिक मंचने आक्षेप घेऊन प्रशासनाचे हे पाऊल म्हणजे नागरिकांच्या कररूपी पैशांचा चुराडा करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी यंदा दीडशे फिरत्या गणेश विसर्जन हौदांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचे वर्गीकरण करून निविदा काढायला सांगितले आहे. २०१९ पर्यंत अनेक वर्षे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद, ३५९ लोखंडी टाक्या, १९१ मूर्ती संकलन व दान केंद्रे अशी व्यवस्था केली होती. याशिवाय वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्याचा आग्रह धरणारे लोक नदीत ही विसर्जन करत होते. ही सर्व विसर्जन यंत्रणा शहरासाठी पुरेशी होती. दरम्यान, २०२० साली कोरोना महामारीमुळे नागरिकांना या विसर्जन सोयी उपलब्ध नसल्याने शहरात ३० फिरते हौद महापालिका प्रशासनाने ठेवले व नागरिकांनी त्यामध्ये गणेश विसर्जन केले. २०२१ सालीही कोरोना महामारीमुळे नागरिकांना या विसर्जन सोयी उपलब्ध नसल्याने शहरात ६० फिरते हौद महापालिका प्रशासनाने ठेवले होते.
मात्र, यंदा २०१९ची मुबलक यंत्रणा उपलब्ध असतानाही महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षीच्या अडीच पट म्हणजे १५० फिरते विसर्जन हौद भाड्याने घेण्याचा तुघलकी निर्णय घेतला आहे. यासाठी जनतेच्या करांचे १ कोटी ३५ लाख रुपये पाण्यात घालायची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.