चारशे कोटींच्या चांदणी चौक उड्डाणपूलाला एवढा उशीर का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:57+5:302021-02-14T04:11:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी आवश्यक एकूण १८.१७ हेक्टर जमिनीपैकी केवळ ०.१३ हेक्टर भूसंपादन होणे बाकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी आवश्यक एकूण १८.१७ हेक्टर जमिनीपैकी केवळ ०.१३ हेक्टर भूसंपादन होणे बाकी शिल्लक आहे. मात्र ही जागादेखील न्यायालयाच्या आदेशानुसार महिन्याभरात मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या जागेतील कामाला परवानगी मिळाली आहे. आता कोणत्याही सबबी नकोत. निर्धारीत वेळेआधी काम पूर्ण करा. अवघ्या चारशे कोटींच्या कामाला एवढा उशीर कशाला,” या शब्दात केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराची हजेरी घेतली.
कोथरुडमधील चांदणी चौकातल्या प्रस्तावित उड्डाणपूलाच्या रखडलेल्या कामावरुन मी खूप जणांची बोलणी ऐकून घेतली. लोकांनाही या कामांचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे दिवस-रात्र काम करा, अशी सूचना गडकरी यांनी शनिवारी (दि. १३) केली. यावर “दीड वर्षे विलंब झाला आहे. तो आम्ही कव्हर करु,” असे आश्वासन संबंधित कंत्राटदाराने दिले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, उड्डाणपुलाचे कंत्राटदार, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आदींची बैठक गडकरी यांनी घेतली. महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, आमदार चंद्रकात पाटील, माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, भीमराव तापकीर, सिध्दार्थ शिरोळे, स्थानिक नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे-पाटील आदी यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी चांदणी चौकातील पुलाच्या कामाची गडकरी यांनी पाहणी केली.
चौकट
चांदणी चौक उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी - १२.८०९ किलोमीटर
प्रकल्पाचा खर्च : ३९७.६० कोटी
प्रकल्प सुरु करण्याचा दिनांक - २८ फेब्रुवारी २०१९
काम पूर्ण होण्याचा अपेक्षित दिनांक - ३१ जानेवारी २०२३
चौकट
गडकरींचे प्रश्न, अधिकाऱ्यांची उत्तरे
१) भूसंपादनाची स्थिती काय आहे?
-येत्या पंधरा दिवसात भूसंपादन पूर्ण होईल. भूसंपादनाविना काम अडेल अशी स्थिती आता नाही.
२) संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली का?
-संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. त्यांच्या जमिनीसाठी देण्याचे १६.८८ कोटी रुपयेदेखील उपलब्ध आहेत.
३) उड्डाणपुलाच्या निधीचा प्रश्न नाही. मग अडचण काय?
-राज्य सरकार आणि महापालिकेने आवश्यक निधी दिला आहे. आता काम रखडणार नाही.
चौकट
‘नवले पूल’ अपघातांवर चिंता
नवले पुल परिसरात वाढलेल्या अपघातांबद्दल नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. “या रस्त्याची अभियांत्रिकी कामे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहेत. तरीही अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांना उपयुक्त मार्गदर्शक उपाययोजना केल्या जात आहेत,” असे महामार्ग अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. नवले पूल ते कात्रज चौक या ऐंशी कोटी रुपये खर्चाच्या सहा पदरी रस्त्यास मंजुरी दिली आहे. त्याला दोन-दोन ‘लेन’चे सर्विस रोड असतील, असे गडकरी यांनी सांगितले. या शिवाय कात्रज घाट परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.३ किलोमीटर लांबीचा सहापदरी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. यासाठी १६० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.