मातीचे धरण का व कसे फुटले ? त्याचा कादंबरीत लेखाजोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:18+5:302021-07-14T04:12:18+5:30
पुणे : 'पानशेत प्रलयाविषयी माहितीपूर्ण पुस्तके आणि अहवाल आहेत; पण ललित अंगाने फारसे लेखन नाही. मातीचे धरण का व ...
पुणे : 'पानशेत प्रलयाविषयी माहितीपूर्ण पुस्तके आणि अहवाल आहेत; पण ललित अंगाने फारसे लेखन नाही. मातीचे धरण का व कसे फुटले? त्यात भ्रष्टाचार वा राजकारण होते का? तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळली? पूरग्रस्तांचे पुनर्वसन कसे झाले? आपत्तीमध्ये माणूस व समाज कसा वागतो? हे सारे कादंबरीत चित्रित केले आहे. बदलते शहर, बदलती मूल्ये, बदलती कुटुंबे यांचाही पट मांडण्यात आला आहे,’ असे लेखिका आश्लेषा महाजन यांनी सांगितले.
पानशेत धरण फुटण्याच्या घटनेला सोमवारी (दि. १२) साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आश्लेषा महाजन यांच्या '१२ जुलै, १९६१' या पानशेत धरणफुटीचा मागोवा घेणा-या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते सोमवारी झाले. या पुस्तकाची निर्मिती इंकिंग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेने केली आहे.
कुवळेकर म्हणाले, 'साठ वर्षांतला बदलता काळ विविध पात्रांच्या माध्यमातून रोचक पद्धतीने वाचकांसमोर साकारतो. विश्वासार्ह ग्रंथांचा आणि संदर्भांचा अभ्यास करून त्याचा ललित आविष्कार कादंबरीत केलेला आहे.
सहकारनगर प्रभागात शेकडो पूरग्रस्तांचे पुनर्वसन झाले असले तरी अनेक पूरग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रशासकीय पातळीवर पानशेत पूरग्रस्त वास्तू हक्कासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत,' असे नगरसेविका अश्विनी कदम यांनी सांगितले.
' मुखपृष्ठकार अजय प्रभाकर आणि रेखाचित्रकार डॉ. मयूरी वाघ यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाशक आनंद लिमये यांनी प्रास्ताविक केले. राजेश मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य महाजन याने आभार मानले.
-----------