मिळकत कर सवलतीसाठी नव्याने अर्ज कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:20 IST2025-01-03T10:19:52+5:302025-01-03T10:20:49+5:30
निर्णयाचा फेरविचार करण्याची माजी नगरसेवकांची मागणी

मिळकत कर सवलतीसाठी नव्याने अर्ज कशाला?
पुणे : सौरऊर्जा, गांडूळ खत आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा असलेल्या मिळकतींना महापालिका अनेक वर्षे मिळकत करात सवलत देते. ही सवलत आगामी बिलातही मिळविण्यासाठी मिळकतधारकांनी नव्याने अर्ज करावेत, असे आदेश महापालिकेने काढले आहे. त्यावर या सवलतीसाठी अर्ज नव्याने करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे.
सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिग आणि गांडूळ खत प्रकल्प असे पर्यावरणपूरक प्रकल्प उभारलेल्या सोसायट्यांना किंवा अन्य मिळकतधारकांना महापालिकेतर्फे मिळकत कराच्या सर्वसाधारण करात ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. प्रामुख्याने कोणताही एक प्रकल्प असल्यास मिळकतकराच्या सर्वसाधारण करात ५ टक्के, तर दोन प्रकल्प असल्यास १० टक्के सवलत दिली जाते. सोसायटीने हे प्रकल्प उभारलेले असल्यास सर्व सदस्यांना सवलतीचा लाभ मिळतो.
महापालिकेतर्फे शहरातील अशा प्रकारे प्रकल्प उभारलेल्या सुमारे एक लाख २८ हजार मिळकतींना मिळकत करात सवलत दिली जाते. या मिळकतींना दिल्या जाणाऱ्या सवलतीची एकूण रक्कम दरवर्षी ९ कोटी रुपयांहून अधिक होते. मात्र, ही सवलत घेतल्यानंतर अनेक ठिकाणी हे प्रकल्प बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, व्हर्मिकल्चर प्रकल्प उभारलेल्या मिळकतधारकांनी २५-२६ या आर्थिक वर्षासाठी सवलत मिळविण्याकरिता १५ फेब्रुवारीपूर्वी लगतच्या क्षेत्रीय कार्यालयात अर्ज सादर करावेत. पूर्वीपासून ही सवलत घेतलेल्या; परंतु प्रकल्प बंद असलेल्या मिळकतधारकांची सवलत बंद केली जाईल. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी काढले आहेत.
संपूर्ण यंत्रणा अडकून पडेल
सौरऊर्जा, गांडूळ खत प्रकल्प तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी योजनांसाठी असणारी कर सवलत चालू ठेवण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. यामध्ये संपूर्ण यंत्रणा अडकून पडणार आहे. पुणेकर प्रामाणिकपणे कर भरत आहेत, आपले बिल पोहोचले नाही तरी देखील बिल काढून पैसे भरतात. क्षेत्रीय कार्यालयाची यंत्रणा यासाठी वापरणे योग्य नाही. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सवलत मिळत असलेल्या १०० मिळकतींची तपासणी केली तर आपल्याला यामध्ये वस्तुस्थितीचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे याबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी केली आहे.