आता बापटांचा नंबर का? समाज कुठवर सहन करणार...? पुण्यात पुन्हा फ्लेक्सबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 09:17 AM2023-02-06T09:17:45+5:302023-02-06T15:54:55+5:30

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून कसबा निवडणूक बिनविरोध करावी अशी भाजपची विनंती

Why Bapat number now? Where will the society tolerate Flexbaji again in Pune | आता बापटांचा नंबर का? समाज कुठवर सहन करणार...? पुण्यात पुन्हा फ्लेक्सबाजी

आता बापटांचा नंबर का? समाज कुठवर सहन करणार...? पुण्यात पुन्हा फ्लेक्सबाजी

googlenewsNext

पुणे : आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. १९९२ च्या पोटनिवडणुकीत भाजपला हार पत्करावी लागली होती. त्यामुळे यावेळी काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. त्यातच पुण्यातील शनिवारवाड्याजवळ पुणेकरांकडून पुन्हा फ्लेक्सबाजी पाहायला मिळाली आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बापटांचा नंबर का? समाज कुठवर सहन करणार...? असा आशय शेवटच्या दोन वाक्यात लिहिला आहे. 

या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वानीच जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून कसबा निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करत आहे. परंतु विरोधी पक्षांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. भारतीय जनता पक्षाने पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय पक्ष कार्यालयातून दोन्ही नावांची घोषणा झाली असून चिंचवड मतदारसंघासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. तर, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आज भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अर्ज दाखल करणार आहेत. त्यातच कसबा विधानसभा मतदार संघात अशी फ्लेक्सबाजी पाहायला मिळाली आहे. 

फ्लेक्सवरील मजकूर 

कुलकर्णींचा मतदार संघ गेला....  
टिळकांचा मतदार संघ गेला..... 
आता बापटांचा नंबर का? 
समाज कुठवर सहन करणार...? असा सवाल पुणेकरांनी फ्लेक्सबाजीच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

Web Title: Why Bapat number now? Where will the society tolerate Flexbaji again in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.