प्रयोगशाळेवर कोट्यवधी खर्च कशाला, नागरिकांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:55 AM2018-02-01T03:55:02+5:302018-02-01T03:55:19+5:30
कोट्यवधीची गुंतवणूक, नंतर त्याचे खासगीकरण, पुन्हा त्या संस्थेसाठी खर्च, फायदा मात्र शून्य. असा आतबट्ट्याचा व्यवहार तत्काळ बंद करण्याऐवजी तो सुरू ठेवण्याच्या महापालिकेच्या कारभारावर सजग नागरिक मंचाने बोट ठेवले आहे. कोंढवा येथील महापालिकेच्या मालकीच्या प्रयोगशाळेच्या संदर्भात हे घडले असून, ती बंद करावी अशी मागणी मंचाने आयुक्तांकडे केली आहे.
पुणे - कोट्यवधीची गुंतवणूक, नंतर त्याचे खासगीकरण, पुन्हा त्या संस्थेसाठी खर्च, फायदा मात्र शून्य. असा आतबट्ट्याचा व्यवहार तत्काळ बंद करण्याऐवजी तो सुरू ठेवण्याच्या महापालिकेच्या कारभारावर सजग नागरिक मंचाने बोट ठेवले आहे. कोंढवा येथील महापालिकेच्या मालकीच्या प्रयोगशाळेच्या संदर्भात हे घडले असून, ती बंद करावी अशी मागणी मंचाने आयुक्तांकडे केली आहे.
सन २०११मध्ये महापालिकेने कोंढवा येथे एक प्रयोगशाळा सुरू केली. महापालिका हद्दीतील अन्न व खाद्यपदार्थांचे नमुने तपासणे हे तिचे काम. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधीचा खर्च केला. तो कमी वाटला म्हणून तिथे ७.७० कोटी रुपयांची अत्याधुनिक उपकरणे घेण्यात आली.
महापालिकेला तिथे काम करणे जमेना म्हणून एका खासगी संस्थेबरोबर ५ वर्षांचा करार करण्यात आला. त्यानुसार महापालिकेने या संस्थेला प्रयोगशाळा चालवण्यासाठी ५२ लाख ८० हजार रुपये देण्याचे ठरले. शिवाय त्यात दरवर्षी १५ टक्के वाढ करण्याचे संस्थेच्या फायद्याचे कलमही जोडण्यात आले.
हिशेब केला असता ५ वर्षांत महापालिकेला १२ लाख ७८ हजार रुपये मिळाले व या कामासाठी नियुक्त केलेल्या एका कनिष्ठ कारकुनाच्या वेतनात ते खर्चही झाले. याचा सरळ अर्थ महापालिकेसाठी प्रयोगशाळेचा हा सगळा व्यवहार आतबट्ट्याचाच ठरला आहे व तरीही प्रशासनाने ५ वर्षांचा करार संपल्यानंतर पुन्हा त्याच संस्थेबरोबर हा करार वाढवून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. पदाधिकारी त्यासाठी संमती देत आहेत. ही सगळी प्रक्रिया थांबवावी अशी मागणी मंचाच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे, तिथे दाद घेतली न गेल्यास सर्व आकेडवारीनिशी योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशाराही मंचाने दिला आहे.
आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या
मागील ५ वर्षांत या करारानुसार महापालिकेने या संस्थेला प्रयोगशाळा चालवण्यासाठी तब्बल ३ कोटी ५६ लाख रुपये दिले आहेत. प्रयोगशाळेतील साहित्यासाठी काही लाख रुपयांचा खर्च महापालिकेने केला आहे तो वेगळाच.
करार करतानाच या प्रयोगशाळेतून महापालिकेस दरवर्षी किमान ५० लाख रूपये उत्पन्न मिळेल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मागील ५ वर्षांत महापालिकेचे प्रयोगशाळेतून मिळणारे उत्पन १ ते ३ लाख रुपयांच्या दरम्यानच राहिले आहे, असे मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांचे म्हणणे आहे.