हिरवाईने नटलेल्या तळजाईवर सिमेंटीकरण कशाला ?पर्यावरणप्रेमींमध्ये संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 01:12 PM2019-06-24T13:12:45+5:302019-06-24T13:42:27+5:30

‘‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असे उपदेश सरकार जनतेला देत आहे. पण दुसरीकडे टेकड्यांवर बेसुमार वृक्षतोड होत आहे

Why cement concrete on greening taljai tekdi ? | हिरवाईने नटलेल्या तळजाईवर सिमेंटीकरण कशाला ?पर्यावरणप्रेमींमध्ये संताप 

हिरवाईने नटलेल्या तळजाईवर सिमेंटीकरण कशाला ?पर्यावरणप्रेमींमध्ये संताप 

googlenewsNext
ठळक मुद्देनैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्याची गरजविकासाच्या नावाखाली वनराईचे नुकसान 

सुषमा नेहरकर-शिंदे / श्रीकिशन काळे। 
पुणे : शहरातील निसर्गसौंदर्याने नटलेली तळजाई टेकडीवर गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी सिमेंटीकरण करण्यात येत आहे. तसेच खडी, सिमेंट टाकून रस्ता तयार केला जात आहे. पायवाटेवर ब्लॉक्स टाकले आहेत. या सर्वांमुळे टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत असून, हे सिमेंटीकरण करण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे, असा सवाल टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला. शहरात सर्वत्र सिमेंटीकरण केले आहे. आता टेकड्या तरी सोडा, असा वैताग ‘लोकमत’कडे व्यक्त करून टेकडीचा नैसर्गिकपणा कायम ठेवावा, अशी अपेक्षाही 
व्यक्त केली.   
टेकडीवर नागरिकांना चालण्यासाठी आणि वाहनांसाठी डांबरी रस्ता आणि सिमेंटचा रस्ता तयार आहे. तो तेवढा पुरेसा आहे. परंतु, टेकडीच्या अंतर्गत रस्त्यांवरही खडी आणि सिमेंट टाकले जात आहे.

ठिकठिकाणी ढिगारे पडलेले आहेत. बुलडोझर लावलेले आहेत. हे सर्व टेकडीवर कशासाठी आणले आहे? असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. जर सर्वत्र सिमेंटचे रस्ते केले, तर पाणी मुरणार तरी कसे? त्यामुळे अगोदर टेकडीवर झाडांना पाणी देताना कसरत करावी लागते, त्यात असे रस्ते तयार झाले, तर पाण्याची दुर्भिक्ष्य अजून जाणवणार आहे. असे प्रकल्प टेकडीवर राबविणेच चुकीचे आहेत. त्यामुळे ते त्वरित थांबवावेत, अशी मागणीही पर्यावरणप्रेमींनी केली आहे. 
..........
खडी, सिमेंटचे ढिगारे होते. काही ठिकाणी रस्तेही तयार केले आहेत. खरंतर टेकडीवर अशी कामे करायची गरजच नाही. हे सर्व साहित्य पाहून इथे काहीतरी वेगळेच तयार करण्याचा घाट सुरू आहे. त्याला विरोध होणे आवश्यकच आहे. कारण स्वच्छ श्वास घेण्यासाठी शहरात हीच एक जागा उरली आहे. त्याचेदेखील नुकसान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व नागरिकांनी मिळून हे थांबवायला हवे. जनतेचा रेटा निसर्ग वाचवू शकतो.’’ 
..........
सुशोभीकरणाच्या नावाखाली नुकसान 
पर्यावरणप्रेमी लोकेश बापट म्हणाले, ‘‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असे उपदेश सरकार जनतेला देत आहे. पण दुसरीकडे टेकड्यांवर बेसुमार वृक्षतोड होत आहे. टेकड्या या शहराचे फुफ्फुसे आहेत. त्या स्वच्छ हवा देतात. टेकडी सुशोभीकरणाच्या नावाखाली विकास होत नसून, सर्वत्र भकासच होत आहे. विकासाला आमचा विरोध नाही. पण निसर्गाचा ऱ्हास करून विकास करू नये. 

राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई का नाही? 
रस्त्यावर नागरिकाने राडारोडा टाकला तर, त्याच्यावर महापालिका कारवाई करते. मग टेकडीवर टाकण्यात येणाºया राडारोड्यावर कारवाई का होत नाही. टेकडीवर जर काही काम करायचे असेल, तर त्या संबंधित कामाचा फलक या ठिकाणी लावला पाहिजे. या कामासाठी नागरिकांच्या हरकती घेतल्या पाहिजेत. या जागेवर कोणते आरक्षण टाकलेले आहे का? या बाबींवर विचार करून पुढील कामे केली पाहिजेत. परंतु, नागरिकांना डावलून हे काम केले जात आहे. त्यामुळे या कामाबाबत दिशाभूल होत आहे. कोणी म्हणते वाहनतळ होणार आहे. पण या ठिकाणी वाहनतळाची गरजच काय? कशासाठी हवे? यावर विचार करायला हवा, असे पर्यावरणप्रेमी मकरंद शेंडे म्हणाले. 
.............
स्वच्छ आणि चांगली हवा आता टेकड्यांवरच घेता येते. त्यात तळजाई टेकडी अतिशय सुंदर असून, तिथेही सिमेंटीकरण करणे अत्यंत अयोग्य आहे. टेकडीवर त्यामुळे पाणी कसे मुरेल? नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवले पाहिजे. अगोदरच टेकडीवर खूप सिमेंटीकरण झालेले आहे. अजून काही नको. वॉकिंगसाठी ब्लॉक्स बसविले आहेत, तेदेखील चुकीचे आहे. टेकड्यांवरील हिरवाई नष्ट करणारा विकास आम्हाला नकोय. 
- संजय जाधव, नागरिक
आम्ही ऐकलंय की इथे पार्किंग करणार आहेत. कशाला हवे इथे पार्किंग? काय गरज आहे. लोकांनी चालायला यायला हवे आणि गाडीवर फिरायला नको. विकासाच्या नावाखाली कसलेही बांधकाम करू नये. अन्यथा नागरिक रस्त्यावर येतील. 
- सुनंदन कुलकर्णी, नागरिक 
.........
आमदारकीसाठी होतोय ‘तळजाई टेकडी’च्या श्रेयाचा अट्टहास
पुणे : तीन-चार महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत  पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या लोकप्रतिनिधीच्या श्रेयवादामध्ये पर्यावरणप्रेमी व सर्वसामान्य पुणेकरांच्या प्रयत्नांमुळे टिकून राहिलेल्या ‘तळजाई’ टेकडीचा ऱ्हास होऊ घातला आहे. या मतदारसंघातील सर्वच इच्छुक उमेदवारांकडून केवळ आपल्या आमदारकीसाठी ‘तळजाई टेकडी’चा विकास आणि विरोधाचा अट्टहास धरला जात आहे.
पुणेकरांना शुद्ध हवा मिळण्यासाठी आता केवळ शहराचे वैभव व खºया अर्थाने फुफ्फुसे असलेल्या टेकड्यांचा आसरा राहिला आहे. परंतु विकासकामांच्या नावाखाली आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा डोळा या टेकड्यांवर आहे. टेकड्यांवरील जैववैविध्यता टिकली पाहिजे, यासाठी हजारो पर्यावरणपे्रमी झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करीत असताना विकासकामांच्या नावाखाली सिमेंटची जंगले उभे केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केल्या काही वर्षांत तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणात सिमेंटीकरण करण्यात आले आहे. मोठे सिमेंट रस्ते, सिमेंटची लहान-मोठी स्ट्रक्चर उभी करून येथील नैसर्गिकतेला बाधा आण्याचा प्रयत्न सुुरू आहे. 
तळजाईच्या तब्बल १०८ एकरांचा विकास आराखडा तयार करून येथे क्रिकेट स्टेडियम, बांबू उद्यान, नक्षत्र गार्डन, सोलर रुफ पॅनल पार्किंग, रानमेवा उद्यान, पक्षी उद्यान, महिलांसाठी स्वतंत्र क्रीडा केंद्र, जलाशय प्रस्तावित करण्यात आले आहे. या आराखड्यानुसार कामे करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. परंतु हा आराखडा तयार करताना पर्यावरणप्रेमी नागरिकांना, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याने प्रकल्पाला विरोध होत आहे. परंतु तळजाई टेकडीचा विकास आणि स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होणारा विरोध आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
.........
आमदारकीसाठी विरोध सुरू आहे
मी माझ्या २५ वर्षांच्या राजकारणामध्ये शहराचा विकास व नागरिकांचे हित लक्षात घेऊनच विविध प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत. तळजाई टेकडी माझ्या मतदारसंघात आल्यानंतर मी तब्बल १०८ एकरांचा एकत्रित विकास आराखडा तयार केला. त्यानुसार कामदेखील सुरू केले. तळजाईवरील एकाही झाडाला हात न लावता येथील जैववैविध्यतेला धक्का न लावता हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. परंतु केवळ आमदारकी डोळ््यासमोर ठेवून काही लोकांकडून या चांगल्या प्रकल्पाला विरोध होत आहे.
- आबा बागूल, नगरसेवक

.................

प्रकल्प होऊ देणार नाही
तळजाई टेकडीवर मी गेल्या १५ वर्षांत टँकरद्वारे पाणी घालून एक-एक झाड वाढविले आहे. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व अन्य पर्यावरणपे्रमी नागरिकांनीदेखील थेंब-थेंब पाणी देऊन येथील जैववैविध्यता टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आता तळजाईच्या विकास आराखड्याच्या नावाखाली येथील वृक्षतोड व सिमेंटची जंगले उभे करण्याचा घाट घातला जात आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत एकाही झाडाला हात लावू देणार नाही. तसेच हा प्रकल्पदेखील हाणून पाडू.
- सुभाष जगताप, स्वीकृत नगरसेवक

.......................

तळजाई टेकडीला सिमेंटच्या जंगलापासून वाचविणार
स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रशासनाच्या मदतीने तळजाई टेकडीवर सिमेंटची जंगले उभे करण्याचा घाट घातला आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत येथील एकही झाड तोडू देणार नाही. यासाठी नागरिकांच्या मदतीने ‘तळजाई टेकडी वाचवू’ मोहीम हाती घेण्यात आली असून, प्रकल्पाला विरोध असणाºया नागरिकांच्या सह्या घेण्यात येत आहेत. त्यामुळे तळजाई टेकडीच्या संवर्धनासाठी पूर्णपणे प्रयत्न करू.
- अश्विनी कदम, नगरसेवक
 

Web Title: Why cement concrete on greening taljai tekdi ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.