फिट अँड फाईन शुभमन गिलला डेंग्यू का झाला? ग्रीन अर्थच्या संस्थापकांचं हे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 09:57 AM2023-10-12T09:57:36+5:302023-10-12T09:59:42+5:30

सकस आहार आणि नियमित व्यायाम करुन फिट अँड फाईन असलेल्या शुभमनला डेंग्यू का झाला असावा याची चर्चा होत आहे. 

Why did fit and fine Shubman Gill get dengue? This is the observation of the founders of Green Earth Anil Shidore | फिट अँड फाईन शुभमन गिलला डेंग्यू का झाला? ग्रीन अर्थच्या संस्थापकांचं हे निरीक्षण

फिट अँड फाईन शुभमन गिलला डेंग्यू का झाला? ग्रीन अर्थच्या संस्थापकांचं हे निरीक्षण

पुणे - शुभमन गिलडेंग्यूने त्रस्त असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. यानंतर तो उपचारासाठी चेन्नईत राहिला आणि उर्वरित संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला रवाना झाला. आता गिल अहमदाबादमध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. येथे १४ ऑक्टोबरला भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. मात्र, डेंग्यू झाल्याने शुभमनला विश्वचषकातील २ सामन्यांना मुकावे लागले. मात्र, सकस आहार आणि नियमित व्यायाम करुन फिट अँड फाईन असलेल्या शुभमनला डेंग्यू का झाला असावा याची चर्चा होत आहे. 

ग्रीन अर्थ संस्थेचे संस्थापक आणि मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी शुभमन गिलला एवढी मोठी संधी डेंग्युमुळे गमवावी लागल्याबद्दल निराशा व्यक्त केली. तसेच, यामागचे नेमकं कारण काय असावं, हे शोधण्याचा त्यांनी पर्यावरणात्मक पद्धतीने अभ्यास केला आहे. शिदोरे यांनी वातावरणातील बदल आणि जीवनशैली यावर भाष्य करताना शुभमन गिलच्या डेंग्यूमागील निरीक्षण नोंदवले आहे.

शुभमन गिल बाबत वाईट वाटतं. इतक्या अप्रतिम फॅार्ममध्ये असतानाही त्याला डेंग्यू झाला आणि निदान काही सामन्यांकरता तरी त्याला मैदानापासून लांब रहावं लागतंय. वास्तविक व्यायाम, आहार ह्याबाबतीत तो मुळीच बेफिकीर नसणार. मग तरीही असं का झालं?. सार्वजनिक आरोग्यातील पर्यावरणीय स्वच्छता (Environmental Sanitation) नसेल तर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया असे रोग होतात. वाटलं, शुभमन सारखे अजून कितीतरी असतील जे त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात असं काही गमावून बसत असतील, असे मत शिदोरे यांनी व्यक्त केले. 

सध्या नुसती आसपास नजर टाकली तरी सर्दी, खोकला, घसादुखी अशा छोट्या-मोठ्या आजारांनी असंख्य लोक त्रस्त आहेत. हे एका अर्थानं सार्वजनिक. आरोग्यातील व्यापक संकट असावं, परंतु खरी, विश्वासार्ह माहिती नसल्यानं काही नक्की करता येत नाही. अशानं कितीतरी शुभमन असतील ज्यांची संधी नाकारली जात असेल. ह्याचा अर्थकारणावर परिणाम होत असेल. कुणीतरी ह्याचा शोध घ्यायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शुभमन गिल आज चेन्नईहून अहमदाबादला रवाना होणार आहे. त्याची प्रकृती बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सुरू राहणार असून तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. बीसीसीआयकडून गिलच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की गिल आज अहमदाबादला पोहचेल आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो राहील, असं सांगण्यात येत आहे. आगामी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात गिल खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Web Title: Why did fit and fine Shubman Gill get dengue? This is the observation of the founders of Green Earth Anil Shidore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.