"...तर अशोक सराफ मुख्यमंत्री झाले असते...", राज ठाकरे असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 07:18 PM2023-01-08T19:18:56+5:302023-01-08T19:28:23+5:30
दक्षिणेत त्यांच्या प्रतिमेवर 40 - 40 फूट फलकावर दुग्धभिषेक झाला असता
पुणे : कलावंतांमुळे देशात अराजकता पसरलेली नाही. कारण कलावंतांमुळे आपण त्यात गुंतून राहतो आणि दुसरीकडे लक्ष जात नाही. आपल्याकडे अशोक सराफ हे गेली पन्नास वर्षे चित्रपटसृष्टीत राहून आपल्याला हसवत आहेत. खरंतर ते दक्षिणेकडे हवे होते. तिथे असते, तर ते आज मुख्यमंत्री झाले असते. परंतु, आपल्याकडे मात्र तसे महत्त्व दिले जात नाही. परदेशात कलावंतांची कदर केली जाते. अशोक सराफ हे युरोपात असते, तर तिथे खुद्द पंतप्रधान अशा कार्यक्रमाला आले असते, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
अभिव्यक्ती प्रस्तुत व रावेतकर आयोजित अशोक पर्व या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या सांगता समारंभाला ते आले होते. तेव्हा ते बोलत होते. अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरी व चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षानिमित्त हा सोहळा आयोजिला होता. याप्रसंगी अशोक सराफ यांचा सन्मान राज ठाकरे यांच्या हस्ते झाला. अभिनेते प्रशांत दामले, निवेदिता सराफ, राजेश दामले, अमोल रावेतकर उपस्थित हाेते.
राज ठाकरे म्हणाले, कलावंतांचे आपल्या देशावर खूप उपकार आहेत. देश चुकीच्या दिशेला गेला नाही, त्याला कारण अशोक सराफ यांच्यासारखे कलावंत आहेत. सर्व कलावंत, दिग्दर्शक, कवी, संगीतकार, नाट्यक्षेत्र, गायन नसते तर आपल्याकडे काय झाले असते. आपण बाहेरच्या देशात बघतोय काय होतेय ते. अशी माणसे आता होणे नाही.’’
सराफ हे मूळ बेळगावचे आणि जन्म मुंबईचा आहे. खरंतर त्यांनी बेळगाव सीमावाद प्रश्न सोडवायला हवा. यावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि खुद्द अशोक सराफ यावर खळखळून हसले.
राज ठाकरेंनी चेहरा लपवला...
अशोक सराफ मनोगत व्यक्त करताना म्हणाले, राज ठाकरे हा माणूस माझा आवडता आहे. अभ्यास करून ते बोलतात. ते अतिशय ब्रिलियंट आहेत. त्यांच्याकडून माझा सन्मान होतोय, ते माझे खरोखर भाग्य आहे.’’ यावेळी व्यासपीठावर असणारे राज ठाकरे यांनी मात्र आपला चेहरा दोन्ही हाताने लपवला आणि त्यानंतर अशोक सराफांना नमस्कार केला.