Eknath Shinde: पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, पनवेलचे कर्मचारी का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 06:14 PM2024-08-05T18:14:08+5:302024-08-05T18:14:35+5:30
पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते
पुणे: पुण्यातील पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पाहणी केली. त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. सिंहगड रोडच्या एकतानगरीतही शिंदेंनी भेट दिली. यावेळी त्यांनी पनवेल, ठाणे या भागातून कर्मचारी का पाठवले? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पुण्यात सिंहगड रोड भागात एकतानगरीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत पुणे महापालिकेच्या मदतीसाठी पनवेल, ठाणे, नवी मुंबईचे काही अधिकारी आणि कर्मचारी पाठवण्यात आले होते. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर एका महापालिकेवर खूप लोड येतो. चिपळूणला आलेल्या पुराच्या वेळीसुद्धा मी ठाणे, पनवेलच्या अधिकाऱ्यांना पाठवलं होत. त्याप्रमाणे पुण्यात पुराच्या वेळी ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी पाठवले असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे.
पुण्याच्या सिंहगड रोड भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या घरातल्या वस्तू पाण्यात वाहून गेल्या. त्यांचा संसार रस्त्यावर आला. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणेने तातडीने लोकांना मदतीचा हात देऊन पुरातून बाहेर काढले. आर्मीचे पुणेकरांसाठी धावून आले होते. त्याबरोबरच महापालिका अधिकारी, कर्मचारी, अग्निशमनचे जवान मैदानात उतरले होते. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आर्मी तातडीने धावून आली. तर ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारीही मदतीस आले होते.
पुणे महापालिकेवर झाली होती टीका
पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा पुणे महापालिकेवर टिका केली होती. पुण्यासारख्या मोठ्या शहरात दुसऱ्या महापालिकेचे अधिकारी बोलवावे लागतात हि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे ते म्हणाले होते. तर विरोधकांनी सुद्धा बाहेरचे कर्मचारी का बोलवावे लागतात? हा सवाल उपस्थित केला होता.
रेस्क्यू ऑपरेशन अतिशय सुरळीतपणे झालं
पुण्यात पुर आला तेव्हा मी कंट्रोल रूम मधून पाहत होतो. त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनडीआरएफ, प्रशासन यंत्रणा शिवाय आर्मीच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलं कि, तुम्ही तात्काळ या सर्व पूरग्रस्तांच्या मदतीला जा. आपली फायर ब्रिगेडही इथे कार्यरत होती. इतर ठिकणी सर्व झाल्यावर आर्मी जाते. पण आपल्याकडे आर्मी सर्व प्रथम आली आणि आपल्याला मदतीचा हात दिला. रेस्क्यू ऑपरेशन अतिशय सुरळीतपणे झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीव वाचवण्याला प्राधान्य दिले गेले. असे एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर सांगितलं.