खेळता-खेळता मुलाने बाहुलीसह स्वतःलाही फास का लावला?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 12:33 PM2022-06-06T12:33:52+5:302022-06-06T12:37:15+5:30
मोबाईल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत...
पुणे: मुलांसाठी खरं-खोटं असं काहीच नसतं. त्यांना सगळी दुनिया खरी वाटते कारण ती सत्यात जगत असतात. मोबाईल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत. खोटं आहे. हे त्यांना कळत नाही.
त्या एका नातवाची गोष्ट आपण ऐकलेली असेलच. आजोबा, नातू रस्त्यावरून जाताना आजोबांना गाडीचा धक्का लागला आणि ते रस्त्यावर पडले. नातू जोरात हसायला लागला. कारण त्याला वाटलं की कार्टूनमध्ये दाखवतात तसं आजोबा काहीही न होता आपोआप उभे राहतील. जखम होणे, दुखावणे या गोष्टी कार्टूनमध्ये नसतात. मुलाला तेच खरं वाटत होतं. बरीचशी कार्टून बघणारी मुलं बोलताना त्या कार्टूनमधल्या लोकांसारखीच बोलतात, तशीच वागतात.
आपण मुलांना आभासी गोष्टींकडे का ढकलत आहोत? त्यांना खरं आणि खोटं यातलं अंतर माहीत नाही हे आपण कधी समजावून घेणार? मूल कधी समजून घेणार? खूप वेळा असं वाटतं की बऱ्याच पालकांसाठी कामावरच्या एखाद्या प्रोजेक्टसारखाच मूल हा एक प्रोजेक्ट आहे. आपल्याला योग्य वेळ बघायची, मूल होऊ द्यायचं आणि मग प्रत्येक गोष्ट आऊटसोर्स करायची.
त्याला वयाच्या तिसऱ्या, चौथ्या महिन्यापासूनच डे केअरमध्ये ठेवायचं, वेगवेगळ्या क्लासेसमध्ये टाकायचं, आपल्याला वेळ, फुरसत असेल तेव्हा लाड करायचे, आपल्याला सांभाळता येत नाही या अपराधीपणातून त्यांच्यावर विकतची महागडी खेळणी, कपडे, चित्रविचित्र खायच्या वस्तू यांचा भडीमार करायचा. मुलांना एवढ्या लहान वयात मार्केटचे गुलाम बनवून टाकलं आहे.
मूल एक जिवंत, रसरशीत, व्हल्नरेबल व्यक्तिमत्त्व आहे, त्याला फक्त निरपेक्ष प्रेम, शारीरिक, मानसिक सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि विश्वास याच गोष्टी बहरून येण्यासाठी आवश्यक आहेत, बाकी काही नाही हे आपण कधी समजून घेणार?
मुलांना मोबाईलचं व्यसन लावणारे आईवडील सगळीकडे सर्रास दिसतात. मूल जेवत नाही, मूल कंटाळलं, मूल दुपारी झोपत नाही, मूल त्रास देतं या सगळ्यासाठी आपल्याकडे एकच उपाय आहे, त्याच्यासमोर मोबाईल ठेवणे, त्यावर सतत बदलत असणारी भडक रंगाची चित्रं असणारी गाणी, कार्टून्स, गोष्टी लावणे. मग मुलांना त्याचं व्यसन लागतं. हो, स्क्रीन आणि मोबाईल ही व्यसनं आहेत. मूल जेवत नाही, मूल कंटाळलं, मूल दुपारी झोपत नाही, मूल त्रास देतं यामागे वेगळी काही कारणं असू शकतात याबद्दल आपण विचारच करत नाही.
अशा मोबाईल, स्क्रीनच्या व्यसनातून जर एखादं मूल असं वावगं वागलं तर त्याच्या आईवडिलांनाच पूर्ण दोषी मानायला पाहिजे असं मनापासून वाटतं. हे सगळं जमत नसेल तर लोकांनी मुलांना जन्माला घालूच नये. तो ऑफिसमधला प्रोजेक्ट नव्हे, जो फसला तर गुंडाळून ठेवता येईल किंवा अन्डू करता येईल.
प्रत्येक मुलाला वयाच्या किमान १२-१३ वर्षांपर्यंत तरी आरोग्यदायी बालपण (काळजी घेणारे आईवडील, त्यात एखादा पालक घरी असणे, चांगला समाज, आरोग्य संपन्न परिसर आणि नो स्क्रीन अनुभवायला मिळायलाच पाहिजे. हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा बालहक्क म्हणून मांडला गेला पाहिजे.
- रंजना बाजी, लेखिका शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यकर्त्या आहेत.