लस टोचल्यानंतर ताप का आला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:11 AM2021-05-08T04:11:05+5:302021-05-08T04:11:05+5:30

डॉक्टरांचा सल्ला : इम्युन रिस्पॉन्समुळे ताप, अंगदुखी, चक्कर येणे अशी दिसतात लक्षणे अंगदुखी, तापाचा त्रास : तुलनेने वयस्करांमध्ये कमी ...

Why did you get fever after vaccination? | लस टोचल्यानंतर ताप का आला?

लस टोचल्यानंतर ताप का आला?

Next

डॉक्टरांचा सल्ला : इम्युन रिस्पॉन्समुळे ताप, अंगदुखी, चक्कर येणे अशी दिसतात लक्षणे

अंगदुखी, तापाचा त्रास : तुलनेने वयस्करांमध्ये कमी रिअॅक्शन

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लस घेतल्यानंतर काहींना अंगदुखी, ताप असा त्रास होत आहे, तर काहींना फारसा त्रास होत नाही. लसीतून आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूला प्रतिकार करण्यासाठी शरीरात अँटिबॉडी (प्रतिपिंडे) निर्माण होऊ लागतात. त्यामुळे या लढ्याचे दृश्य स्वरूप ताप, अंगदुखी, दंड सुजणे अशा लक्षणांच्या स्वरूपात दिसते. ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांना त्रास जास्त जाणवतो. ही लक्षणे दोन-तीन दिवसच टिकतात. त्यामुळे लस घेतल्यानंतर घाबरण्याची गरज नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

प्रत्येक आजाराला प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असते. फ्लू झाल्यावर काहींना खूप ताप येतो, तर काहींना अगदी थोडाच ताप येतो. आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीवर हा प्रतिसाद अवलंबून असतो. लसीच्या बाबतीतही असेच आहे. त्यामुळे लस घेतल्यावर एखाद्याला जास्त त्रास किंवा कमी त्रास होतो. मात्र, त्रास न झाल्यास आपल्या शरीरासाठी लस परिणामकारक ठरलेली नाही, असे समजण्याचे कारण नाही. लस घेतल्यानंतर प्रत्येकाच्या शरीरात योग्य प्रमाणात अँटिबॉडी तयार होतात.

लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होणार नाही असे नाही. परंतु, भविष्यात हा आजार झाल्यास गुंतागुंत कमी होते. त्यामुळे लस घेतलेली असली तरी संसर्ग शृंखला तोडण्यासाठी मास्क सतत वापरणे, योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणे या उपाययोजना करत राहणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

चौकट

लसीतून टोचतात मृत कोरोना विषाणू

सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. आपल्याकडे अँस्ट्रेझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, तसेच भारत बायोटेकची कोव्हॅकसिन या लसींचा वापर केला जात आहे. दोन्ही लसींच्या मानवी चाचण्या पूर्ण होऊन त्यांची परिणामकारकताही सिद्ध झाली आहे. लसींचे गंभीर दुष्परिणाम होत नाहीत, असाही निष्कर्ष समोर आला आहे. कोविशिल्ड लसीमध्ये अँडेनो विषाणू तर कोव्हॅकसिन लसीमध्ये मृत कोरोना विषाणूचा वापर केला जातो. कोणतीही लस घेतल्यावर शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हायला लागते. त्याला इम्युन रिस्पॉन्स असे म्हणतात. त्यामुळे दोन-तीन दिवसांत थोडा त्रास जाणवू शकतो, असेही डॉक्टरांनी अधोरेखित केले.

चौकट

लस घेतल्यानंतर विषाणूविरोधात लढा सुरू होतो आणि त्यामुळे दाह (इंफ्लमेशन) होतो. याचाच परिणाम लक्षणांच्या स्वरूपात दिसतो. तरुणांची प्रतिकारशक्ती जास्त असते, तर ज्येष्ठांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती तुलनेत कमी असते. त्यामुळे तरुणांना लसीकरणानंतर जास्त त्रास होतो, तर वयस्कर नागरिकांना कमी त्रास होतो. संपूर्ण एक दिवस विश्रांती घेतल्यावर त्रास कमी होतो.

- डॉ. सुह्रद सरदेसाई, कन्सलटिंग फिजिशियन

चौकट

१३-१४ दिवसांनी मिळतात अँटीबॉडीज

कोरोना लसीबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. यामुळे बहुतेक लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाही. आपल्या देशात कोरोनाच्या ज्या लशी दिल्या जात आहेत, त्यानं कोणतेही गंभीर साइड इफेक्ट्स होत नाहीत. कोरोना लस ही आरोग्यासाठी लाभदायी आहे. यामुळे शरीरातील अँटीबाँडीज वाढतात. या अँटीबाँडीज कोरोना विषाणूंविरोधात लढतात. रोगप्रतिकारशक्ती काही दिवस, आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाते. भारतीय वातावरणात जेव्हा एखाद्या व्यक्तीला लस दिली जाते, तेव्हा १३-१४ दिवसांनी त्याच्या शरीरात बी पेशी म्हणजे अँटीबॉडीज विकसित होण्यास सुरुवात होते. पण त्या अद्यापही सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचलेल्या नसतात. त्यानंतर कमीत कमी दोन ते तीन आठवडे अँटीबॉडीज निर्माण होत राहतात.

- डॉ. प्रशांत नगरकर, जनरल फिजिशियन

चौकट

विषाणूला प्रतिकारामुळे होतो त्रास

लसीतून टोचलेल्या मृत विषाणूला शरीर प्रतिकार करत असल्याने अंगदुखी, दंड सुजणे, ताप अशी लक्षणे दिसतात. पहिल्या डोसपेक्षा दुसरा डोस घेतल्यावर जास्त त्रास होऊ शकतो. कारण, दुसरा डोस हा बुस्टर डोस असतो. एखाद्या औषधाची अॅलर्जी असलेले रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच लस घेऊ शकतात. कारण, अॅलर्जी ही विशिष्ट औषधाची असते आणि त्याचा लसीशी संबंध नसतो.

- डॉ. अरुणकुमार पाटील, फिजिशियन

Web Title: Why did you get fever after vaccination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.