Video : पुण्याकडे पक्षी का फिरवताय पाठ ? जाणून घ्या त्यामागचं नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 05:34 PM2020-11-05T17:34:21+5:302020-11-05T17:54:38+5:30
शहर आणि परिसरात पक्ष्यांचा अधिवास असणारी अनेक ठिकाणे आहेत. परंतु, आता तिथेही पक्षी येणे कमी झाले आहे..
पुणे : दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या 'पक्षी सप्ताहा' ला यंदा सरकारकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे शहरात तर नदीकाठी पक्षी पाहायला जाण्याची खूप छान परंपरा आहे. मात्र हळूहळू ती लुप्तप्राय होताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी पुणेकरांच्या घरात हक्काने येऊन त्यांना सुरेल आवाजात साद घालणारी, आनंद पेरणारी, आपल्या इवल्या इवल्या चोचीने दाणे टिपणारी, नदी पात्रात मनसोक्त विहार करणारी वैविध्यपुर्ण पक्षी दैनंदिन जीवनाचा भाग होती. पण हल्ली मात्र चिमणीसह कुणीच नजरेला पडत नाही. काय कारण आहे नेमके पक्षांचं पुणेकरांवर रुसण्याचं.. त्याचा पक्षी सप्ताहाच्या निमित्त्ताने त्याचाच घेतलेला हा मागोवा..
दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबर हा पक्षीसप्ताह म्हणून साजरा होतो. ५ नोव्हेंबर अरण्यऋषी साहित्यिक व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन, तर १२ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन असतो. या दोघांच्याही कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने व लोकांमध्ये पक्षीविषयक जाणीव-जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेने २०१७ सप्ताह सुरू केला.
पुणे शहरात आणि परिसरात पक्ष्यांचा अधिवास असणारी अनेक ठिकाणे आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. शहरात नदीकाठी पक्षी पाहायला जाण्याची परंपरा नष्ट झाली आहे. कारण सांडपाणी नदीत येत असल्याने त्यातील मासे आणि पाण वनस्पती नष्ट झाल्या. त्यावर जगणारे पक्षीही येणे बंद झाले आहे. मुठा नदीकाठी सिमेंटचे कठडे असल्याने पाणथळ जागाच नष्ट झाल्या आहेत. परिणामी पक्ष्यांचे खाद्य कमी होत असल्याने त्यांचे येणेही दुर्मीळ होत आहे.
पक्षी सप्ताह कशासाठी ?
पक्षी प्रजातींच्या संकटग्रस्त यादीत दिवसेंदिवस भरच पडत आहे. हे थांबवायचे असेल तर नागरिकांमध्ये पक्ष्यांविषयी प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हायला हवा. त्यासाठीच हा पक्षी सप्ताह आवश्यक आहे. लहान मुलांना पक्षी निरीक्षणासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. तेच भविष्यात पक्ष्यांसाठी चांगले कार्य करू शकतील.
नदीकाठी पक्षी येणे बंदच
नदीला सिमेंटचे काठ आल्याने तिथली परिसंस्था नष्ट झाली. शहरातील नदीची अशीच अवस्था आहे. पण खडकवासला ते विठ्ठलवाडी या परिसरातील काठावर सिमेंटीकरण झालेले नाही. तिथे काही प्रमाणात पक्षी दिसतात. पण विठ्ठलवाडीपासून पुढे शहरात पक्ष्यांसाठी जागाच नाही.