कलाकारांमध्ये भाषिक अस्मिता का दिसत नाही? श्रीपाद जोशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 02:09 AM2018-12-25T02:09:18+5:302018-12-25T02:09:28+5:30
‘दाक्षिणात्य राज्यांमध्ये मातृभाषेची अस्मिता बाळगत सिने-नाट्यसृष्टीतील अनेकांनी राजकीय भवितव्य आजमावले.
पुणे : ‘दाक्षिणात्य राज्यांमध्ये मातृभाषेची अस्मिता बाळगत सिने-नाट्यसृष्टीतील अनेकांनी राजकीय भवितव्य आजमावले. परंतु १२ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात भाषिक अस्मिता बाळगत कला क्षेत्रातून नेतृत्व का पुढे येत नाही, असा खडा सवाल साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपस्थित केला.
साहित्यिक-कलावंत संमेलनात ‘वाग्यज्ञे’ साहित्य व कलागौरव पुरस्काराचे वितरण जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना, तर साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या गेल आॅमव्हेट यांना प्रदान करण्यात आला. या वेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप बराटे, भारत पाटणकर, सचिव वि.दा. पिंगळे, खजिनदार संजय भामरे आणि उपाध्यक्ष राजेंद्र वाघ उपस्थित होते. कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. त्यामध्ये बंडा जोशी, प्रा. वा. ना. आंधळे, भरत दौंडकर, आसावरी काकडे, संगीत म्हसकर, प्रकाश घोडके, राजन लाखे, रमजान मुल्ला, ललिता सबनीस, दिनेश भोसले, अनिल दीक्षित, संदीप जगताप, दादाभाऊ गावडे आणि रमणी सोनवणे सहभागी झाले होते.
महाकोशातील निधी १ कोटीवर जाऊ शकला नाही..
साहित्य संमेलनासाठीचा महाकोशातील निधी १ कोटीच्या वर जाऊ शकला नाही, याची खंत वाटते. मराठी भाषेवरच उपजीविका असलेले प्राध्यापक, शिक्षक, लेखक मंडळी सढळ हाताने मदत करीत नाहीत. दाक्षिणात्य कलाकारांनी अभिनयातील प्रतिमांचे संवाहन केले. त्यामुळेच डीएमके, जयललिता, करुणानिधींसारखे नेतृत्व उभे राहिले. राजकारण म्हणजे केवळ टाकाऊ नाही, त्याद्वारे आपण अभिरुचीसंपन्न समाज घडवू शकतो. मराठी भाषिक कलाकारांमधून असे आदर्श निर्माण झाले पाहिजेत, असे जोशी म्हणाले.