विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्याचा विद्यार्थ्यांचा अट्टहास का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 06:18 PM2021-02-04T18:18:13+5:302021-02-04T18:18:32+5:30
बुधवारी राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय झाला
- शिवानी खोरगडे
पुणे : बुधवारी राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय झाला. पण विद्यापीठ परिक्षांबाबत मात्र विद्यार्थी संभ्रमातच आहेत. आता वैतागून सोशल मिडियावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री आणि विद्यापीठ प्रशासनाला नाराजी व्यक्त करत प्रश्न विचारायला सुरुवात केलीय.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याची घोषणा केली खरी. पण नियमित सत्राच्या परिक्षांचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. एकीकडे महाविद्यालये सुरु होणार आहेत तरी सुध्दा विद्यार्थी मात्र परिक्षा ऑनलाईनच घेण्याचा अट्टहास करत आहेत. महाराष्ट्र स्टुडेंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव इडके यांनी केलेल्या ट्विटनुसार, 'विद्यार्थ्यांची मानसिक परिस्थिती लक्षात घेता नियमित सत्राच्या परीक्षा ऑनलाईन मोडनेच व्हायला हव्यात. हा विषय विद्यापीठांकडे सोपवून उदय सामंत यांनी या विषयातून काढता पाय घेतला आहे. सर्व विद्यापीठांसाठी समसमान निर्णय व्हायला हवा व खासकरुन पुणे आणि नागपूर विद्यापीठाने आपला निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा.'
याशिवाय इडके यांनी 'लोकमत'शी बोलताना हेही सांगितलं की, 'उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सतत सांगण्यात येत होतं की परिक्षा या ऑनलाईनच घेण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तशाच पध्दतीच्या/पॅटर्न परीक्षेची तयारी केलीय. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठं ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेत आहेत. त्यांमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जर ऑफलाईन पध्दतीनं झाल्यात तर भविष्यात विद्यार्थ्यांपुढे स्पर्धा निर्माण होऊ शकते. म्हणजे इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जास्त टक्केवारी असेल आणि पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी असेल. विद्यार्थी अजूनही आपापल्या गावी आहेत. आणि महाविद्यालये सुरु होणार म्हणजे काही पूर्णतः सुरु होऊ शकत नाहीत. टप्प्याटप्प्यानंच सुरु होतील. म्हणून शंभर टक्के विद्यार्थी महाविद्यालयात येणार नाहीत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली तर ती सर्वांना सोयीस्कर ठरणार आहे.'
या संदर्भात 'लोकमत'नं विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला. तेव्हा परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'परीक्षा मंडळाची बैठक येत्या आठवडाभरात विद्यापीठात होईल. संबंधित विषयासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार मंडळाचे आहेत. मी त्या मंडळाचा फक्त सदस्य सेक्रेटरी आहे. त्यामुळे तिथे जे कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि इतर तज्ज्ञ मंडळी आलेला शासन निर्णय आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील. जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे ते विचारात घेऊन परीक्षा मंडळाकडून परीक्षांबाबत ठरवलं जाईल. काही ठिकाणी ऑनलाईन, काही ठिकाणी सेंटर्सवर बोलवून ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाईन परीक्षा होऊ शकतात.'