पुतळे रंगवून शिल्पाकृतीच्या मूळ सौंदर्यांची हानी का करता? कलावंतांचा पुणे महापालिकेला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 01:56 PM2023-05-05T13:56:12+5:302023-05-05T13:57:36+5:30
नव्याने रंग देताना पहिला रंग काढण्याचेही कष्ट घेतले जात नसून रंगांचे थरावर थर चढत जातात व संपूर्ण पुतळा गुळगुळीत होतो
राजू इनामदार
पुणे : शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या वेगवेगळ्या शिल्पाकृतींना महापालिका प्रशासन एका रंगात रंगवून काढते आहे. मूळ शिल्पाकृतीची अशी हानी कशासाठी, असे शहरातील कलावंतांचे म्हणणे आहे. पुतळ्यांचे शिल्पसौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या ‘पुण्याची ओळख’ या सदरात प्रसिद्ध होणारे ‘लोकमत’मधील लेख वाचल्यानंतर अनेक कलावंतांनी ‘लोकमत’बरोबर संपर्क साधून आपल्या या भावना व्यक्त केल्या.
मूळ सौंदर्याची हानी
महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या पुतळ्यांना हा असा एकसारखा रंग मागील काही वर्षांपासून लावण्यात येत असतो. त्याची रीतसर निविदा काढली जाते. एखाद्या कंपनीला हे काम दिले जाते. ब्राँझ (तांबे) या धातूचा आभास करून देणाऱ्या एकसारख्या रंगात ते शहरातील लहानमोठे असे सर्व पुतळे रंगवून टाकतात. त्यातून ते पुतळे चकचकीत दिसतात. मात्र, या रंगामुळे त्या शिल्पाकृतीमधील मूळ सौंदर्य लुप्त होते, असे शिल्पकारांचे म्हणणे आहे. शिल्पकाराने ते अचूकतेने घडवलेले असते. त्यासाठी कष्ट घेतलेले असतात. त्याचा साधा विचारही या रंग लावणाऱ्यांकडून केला जात नाही. दरवर्षी किंवा दोन वर्षांतून एकदा याप्रमाणे सातत्याने रंग दिला जातो. नव्याने रंग देताना पहिला रंग काढण्याचेही कष्ट घेतले जात नाहीत. यामुळे रंगांचे थरावर थर चढत जातात व संपूर्ण पुतळा गुळगुळीत होतो. त्यावरील सर्व डिटेलिंग संपुष्टात येते, अशी या कलाकारांची तक्रार आहे.
हे पुतळे रंगवले गेले
झाशीच्या राणीचा पुतळा पुण्याचे वैभव आहे. सेनापती बापट यांचा पुतळा आजही शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी म्हणून दाखवला जातो. सारबागेजवळचा जमनालाल बजाज यांचा पुतळा, राणा प्रताप उद्यानातील संत बसवेश्वर तसेच एस. एम. जोशी यांचे पुतळे पूर्णाकृती आहेत. त्याशिवाय, शहरात अनेक अर्धपुतळे आहेत. महापालिकेने हे सर्व पुतळे एका रंगात रंगवून काढले आहेत, हे अत्यंत अयोग्य व कलावंतांचीच नाही, तर शहराच्या सौंदर्याची हानी करणारे आहे. फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होते. मात्र, ते निदान काढता तरी येतात, हे रंग मात्र निघता निघत नाहीत, असे शहरातील शिल्पकारांनी सांगितले.
नैसर्गिक छटाच राहू द्यावी
धातूमधील पुतळ्याला नैसर्गिक छटा असतात. हिरवा, पिवळा, तांबडा असे रंग त्यावर चढतात. त्यामुळे पुतळा खुलून येतो. हवामानाच्या परिणामाने हे बदल होतात. मात्र, ते नैसर्गिक असतात. उलट त्यातून पुतळ्याचे मूळ सौंदर्य अधिक उजळते. पुतळा जेवढा जुना दिसेल तेवढा तो अधिक सुंदर दिसत जाईल. त्यामुळे महापालिकेने विनाकारण शिल्पांचे सौंदर्य नष्ट करण्याचा उद्योग करू नये, अशी मागणी या शिल्पकार, कलावंतांनी केली.
निर्णयाची अंमलबजावणी
पुतळे रंगविण्याबाबतचा निर्णय सर्वसाधारण सभेत झाला असावा. आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. पुतळे चांगले, उजळलेले दिसावेत, असा उद्देश तर आहेच. शिवाय, हवामानाचा परिणाम होऊन पुतळ्याचा धातू खराब व्हायचीही शक्यता असते. त्यामुळे रंग दिला जातो. मागील अनेक वर्षे हे काम भवन विभागाच्या माध्यमातून केले जाते. वॉर्ड ऑफिस कार्यालयाच्या अखत्यारीतील पुतळे ते रंगवतात. - हर्षदा शिंदे, प्रमुख अभियंता, भवन विभाग महापालिका
धोरणात्मक निर्णयाची गरज
पुतळे रंगविण्याचा निर्णयच चुकीचा आहे. सगळीकडे एकसारखा रंग. तेही फार विचित्रपणे लावले जातात. यावर काही धोरणात्मक निर्णय व्हायला हवा.- डॉ. श्रीकांत प्रधान, लघुचित्र शैलीचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक
तज्ज्ञांची नियुक्ती करावी
धातूमधील शिल्पे दोन प्रकारांनी तयार केली जातात. गन मेटल किंवा मग तांबे, पितळ, जस्त अशा मिश्र धातूंमधून. ओतकाम झाल्यानंतर धातूंच्या शिल्पांचे ऑक्सिडायझेशन केले जाते. तसे केले, तर मग रंगवण्याची गरज राहत नाही. ते केले नाही, तर मग धातू खराब होऊ शकतो. मात्र, तरीही रंग लावणे अयोग्य व शिल्पसौंदर्याची हानी करणारेच आहे.- विवेक खटावकर, शिल्पकार
रंग लावणे बंद व्हायला हवे
पुतळे रंगवणे हा प्रकारंच अयोग्य आहे. पुतळा जसा आहे, तसाच नैसर्गिक रंगात राहू द्यावा. ‘एसएसपीएम’मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातील पहिला अश्वारूढ पुतळा कधी रंगवलेला दिसला का? मग महापालिका कशाकरिता पुतळ्यांना असे रंग लावते आहे? ते त्वरित बंद व्हायला हवे. - शाम ढवळे, शिल्पचित्रकार, माजी विभागप्रमुख, महापालिका हेरिटेज विभाग
शिल्पकारांचा अवमान
धातूमधील मूळ पुतळेच नागरिकांना पाहू द्यावेत. ते उजळवण्याची काहीही गरज नाही. असे एकसारखे रंगवलेले पुतळे पाहताना वेदना होतात. हा त्या सुंदर शिल्पांचाच नाही, तर ती घडवणाऱ्या शिल्पकारांचाही अवमान आहे. - संजय वाघ, राहुल पारखी, सुनील कोकाटे, चंद्रकांत सोनवणे, सुनील वाळुंज,
(अभिनव कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कलाकार)