नागपंचमीला सापाची पूजा अन् इतर दिवशी त्याचा जीव का घेता ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:13 AM2021-08-13T04:13:51+5:302021-08-13T04:13:51+5:30
पुणे : नागपंचमीला नागाला दूध देणे किंवा जिवंत सापाचे पूजन करण्याचे प्रकार आता बंद झाले आहेत. तसेच साप बाळगण्यावर ...
पुणे : नागपंचमीला नागाला दूध देणे किंवा जिवंत सापाचे पूजन करण्याचे प्रकार आता बंद झाले आहेत. तसेच साप बाळगण्यावर बंदी असल्याने गारूड्यांचे खेळही बंद झाले. एकूणच सापांसाठी समाजाची मानसिकता बदलली असून, ते आपले मित्रच आहेत, त्यांना वाचवले पाहिजे, असा एक संदेश समाजामध्ये पोचला आहे. त्यामुळे नागपंचमीला कागदी सापाची पूजा करण्यावरच भर देण्यात येत आहे. काही ठिकाणी नागरिक साप निघाला की त्याला मारून टाकतात, पण नागपंचमीला मात्र पूजा करतात हा दुजाभाव नष्ट होणे गरजेचे आहे.
श्रावण शुद्धपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात. भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. एक आख्यायिका आहे की, कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन वर आला. तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पूजा केली, अशी कथाही सांगितली जाते. परंतु, खऱ्या अर्थाने साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे.
——————-
साप आढळला तर...
जर आपल्या घरात किंवा घराशेजारी कुठेही साप दिसला तर त्याला मारू नये, तत्काळ सर्पमित्रांना फोन करावा. सर्पमित्र येईपर्यंत त्या सापावर लक्ष ठेवावे. तो इतर कुठे जाणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्याला धोका निर्माण झाला, तर तो हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे सापाला इजा होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.
—————————
पुणे शहर, जिल्ह्यातील विषारी साप
- नाग
- मण्यार
- घोणस
- चापडा
निमविषारी - हरणटोळ
————————
बिनविषारी सापडणारे साप
- तस्कर
- कवड्या
- धामण
- कुकरी
- दिवड/पाणसाप
- गवत्या
- नानेटी
- मांडूळ
——————————————
पुणे शहरात सध्या तरी सापांविषयी चांगली जनजागृती झाली आहे. त्यामुळे शक्यतो नागरिक साप निघाला की, त्याला मारत नाहीत. ते लगेच सर्पमित्राला फोन करतात. पण जर कोणाकडे सर्पमित्राचा नंबर नसेल, तर ते भीतीने त्याला मारतात. खरंतर साप हा आपला मित्रच आहे. तो कधीही स्वत:हून आपल्यावर हल्ला करत नाही. आपण त्याला त्रास दिला नाही, तर तो आपल्याला त्रास देत नाही.
- डॉ. आशिष मेरूकर, सर्पमित्र
———————————————