Video: गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? तृप्ती देसाईंचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 06:33 PM2023-03-27T18:33:18+5:302023-03-27T18:38:56+5:30
महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केली
पुणे: गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटीलची चर्चा राज्यभरात सुरू आहे. राज्यातील तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटल की प्रचंड गर्दीचा माहोल असतो. यात तिच्या अदाकारीने अनेकांना भुरळ पाडली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी व्हिडिओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली. तसेच छुप्या पद्धतीने तिचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. मात्र, यातच आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलसंदर्भात विधान केले होते.
गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात असे ते म्हणाले होते. त्यावरून गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतयं? असा सवाल तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार इंदुरीकर यांना केला आहे. महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केल्याचा मत देसाई यांनी व्यक्त केले आहे. तर इंदुरीकर तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो असा सवालही इंदुरीकर यांना देसाई यांनी केला आहे.
काय म्हणाले होते कीर्तनकार इंदुरीकर
गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षणही दिले जात नाही, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी खंत व्यक्त केली. दुसरीकडे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या वाढदिवसासाठी गौतमी पाटीलचा डान्स ठेवल्याचे समोर आले होते. तसेच लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. कलावंत पोट भरण्यासाठी धडपडतो. पोटासाठी प्रत्येकजण काहीतरी करतो. मात्र जे करायचे आहे, ते चांगले करावे. गौतमी पाटील हिची लावणी नसून डीजे डान्स आहे, अशी टीकाही त्यांनी केली.