रस्त्यावरील खड्डे का बुजवतो? असे म्हणत साईट इंजिनियरला लाथा बुक्क्यांनी मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:50 AM2021-07-15T11:50:06+5:302021-07-15T11:57:12+5:30
हवेली तालुक्याच्या तरडे गाव येथील घटना, मारहाण करणारे सर्वच भावकीतल्या परिचयाचे
लोणी काळभोर: रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम चालू असताना ८ जणांनी खड्डे का बुजवतो? असे विचारून विनाकारण साईट इंजिनियरला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. गळ्याला तलवारी लावून हातातील लाठया व लाथांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले असल्याची घटना हवेली तालुक्यातील तरडे येथे घडली.
याप्रकरणी सिव्हील इंजिनिअर अनिल पांडुरंग जगताप ( वय ३९, रा. तरडे गांव, ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून रविंद्र किसन जगताप ( वय ६५ ), वसंत सोपानराव जगताप ( वय ५५ ), शरद जयवंत जगताप ( वय ३६ ), किशोर वसंत जगताप ( वय २३ ), केतन वसंत जगताप ( वय २० ), किरण किसन जगताप ( वय ३६ ), किसन सोपानराव जगताप ( वय ६५ ), जयवंत सोपानराव जगताप ( ६२ वय सर्व रा. जगताप मळा, तरडे ) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जगताप हे दामले - गंधे असोसिएटस कोथरूड, पुणे यांच्याकडे साईट इंजिनिअर या पदावर कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ते तरडे रोड, कुरकुंडे वस्ती या ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे झालेल्या रस्त्यांचे खड्डे बुजवुन घेण्याचे काम करत होते.
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जगताप मळा तरडे मध्ये राहणारे त्यांच्या परिचयाचे व भावकीचे वरील ८ जण कार मधून आले. त्यांच्या हातात काठया घेऊन खाली उतरले. त्यांच्या पैकी वसंत आणि रविंद्र जगताप यांनी त्यांच्या हातातील तलवारी गळयाला तलवारी अनिल जगताप यांचे गळ्याला लावून मुरुमाच्या गाडया अडवून रस्त्यावरील खडडे का बुजवितो हालायचे नाही असे म्हणाले. त्यानंतर इतर ६ जणांनी त्यांच्या जवळील लाठयांनी मारहाण केली तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांना मुक्कामार लागला व जखमा झाल्या. ते बेशुध्द झाले. यामुळे घटना पाहणारे अजय गाढवे, नितीन जगताप या दोघांनी त्यांना उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटल लोणी स्टेशन येथे दाखल केले. ते शुध्दीवर आल्यानंतर खिशातील ४५ हजार रुपये रोख व गळयातील ६ .५ तोळे वजनाची सोन्याची चैन नसल्याचे त्यांचे लक्षात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी हे करत आहेत.