मध्यमवर्गीय तरुणांना कुणी मुलगी देता का मुलगी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 01:19 AM2018-09-11T01:19:36+5:302018-09-11T01:19:46+5:30
बदलत्या काळात तरुणींसह पालकांच्या वराबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
- नम्रता फडणीस
पुणे : बदलत्या काळात तरुणींसह पालकांच्या वराबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तरुण उच्चशिक्षितच हवा, पुण्या-मुंबईत त्याचा स्वत:चा फ्लॅट हवा, आर्थिक स्थैर्य देणारा हवा याप्रमाणे तरुणींच्या अवाजवी अपेक्षा आता लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या तरुणांसाठी चिंतेची बाब ठरू लागल्या आहेत. या अपेक्षांच्या ओझ्यांमुळे मध्यमवर्गीय तरुणांची ‘लग्नगाठ’ जुळता जुळत नसून, ‘कुणी मुलगी देता का मुलगी?’ अशी तरुणांची अगतिकता झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुळातच आपला भावी जोडीदार कसा असावा, हे लग्नाच्या बोहल्यावर चढणाऱ्या तरुण-तरुणींनी मनात आधीपासूनच पक्के केलेले असते. पूर्वी इंजिनिअर मुलाला इंजिनिअर, डॉक्टरला डॉक्टरच हवी असा एक टेÑंड निर्माण झाल्यामुळे तरुणींची लग्ने जुळणेच अवघड होऊन बसले होते. पण कालपरत्वे कुटुंबाना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटू लागले.
तरुणी देखील आज तरुणांच्या खांद्याला खांदा लावून कमवू लागल्या आहेत. त्या स्वत: तरुणांपेक्षा दुपटीने कमवू लागल्यामुळे भावी जोडीदाराबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत.
अवाजवी अपेक्षा आणि तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळेच लग्न जुळत नाहीत आणि लग्न होत नसल्यामुळेच नैराश्य यायला लागले असल्याची खंत तरुण व्यक्त करीत आहेत.
>गेल्या दोन वर्षांपासून मुली पाहात आहे. एखादी मुलगी पाहायला जाण्यापूर्वीच मुलाची कौटुंबिक स्थिती पाहिली जाते. मुलगा पैसेवालाच हवा, अशी मुलीसह तिच्या कुटुंबीयांची अपेक्षा असते. याबाबतीत ते तडजोड करायला तयार नाहीत.
- कृणाल, सेलिब्रिटी मॅनेजर
स्वत:चे घर आहे, प्रॉपर्टी आहे. पण तरीही मुलीसह तिच्या कुटुंबीयांना पुण्यातच स्वत:चा फ्लॅट असायला हवाय. मी एका कंपनीत नोकरी करतो. तिला लग्न झाल्यावर नक्कीच चांगले सुखकर जीवन देऊ शकतो. वयाच्या तिसाव्या वर्षी मुलीच्या वडिलांचा तरी पुण्यात फ्लॅट होता का? याचा साधा विचारही त्या करीत नाहीत.
- रोहन, नोकरदार
मुलींच्या कुटुंबीयांचे उत्पन्न कमी असते. पण त्यांना मुलगा हा पैसेवालाच हवा असतो. यातच घरात मुलाचे आईवडिल मुलीला नको असतात. आम्ही आई-वडिलांना सोडून येतो, मग तुम्ही पण सोडले पाहिजेत. लग्नाच्या बोलणीमध्ये मुलीच्या आईचाच अधिक हस्तक्षेप पाहायला मिळतो. - सूरज, नोकरदार
स्वत: उच्चशिक्षित असल्यामुळे मनासारखा जोडीदार मिळायला हवा असे मुलींना वाटण्यात गैर काहीच नाही. मुलांच्याही मुलींच्या दिसण्याबाबत आहेतच! ती सुंदर, मॉडर्न असावी, असे मुलांना वाटत असते. त्यामुळे दोन्ही बाजू पाहणे आवश्यक आहे. मुलीला आर्थिक स्थैर्य मिळावे एवढीच पालकांची अपेक्षा असते. आता विवाहासंदर्भातला टेÑंड बदलला आहे असे म्हणावे लागेल. - दीपा निलेगावकर, विवाह समुपदेशक