खासगी सीसीसीला ऑक्सिजन मिळविणाऱ्या माननीयांचे महापालिकेकडे दुर्लक्ष का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:53+5:302021-04-30T04:14:53+5:30
पुणे : कोरोनाबाधितांसाठी आम्हाला आमच्या अमूक एक भागात खासगी कोविड केअर सेंटर (सीसीसी) ला मान्यता द्या़ या सीसीसीमध्ये ...
पुणे : कोरोनाबाधितांसाठी आम्हाला आमच्या अमूक एक भागात खासगी कोविड केअर सेंटर (सीसीसी) ला मान्यता द्या़ या सीसीसीमध्ये आम्ही ऑक्सिजन मिळवू, आमचे संबंधित कंपन्यांशी बोलणे झाले आहे़ असे सांगून, खासगी सीसीसीचा अट्टहास धरणाऱ्या शहरातील माननीयांकडून (नगरसेवक, पक्षातील प्रमुख पदाधिकारी आदी) महापालिकेच्या रूग्णालयांतील ऑक्सिजन तुटवड्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे़
शहरातील काही माननीयांनी आम्हाला सीसीसी सुरू करण्यास परवागनी द्या, आम्ही आमच्या सीसीसीमध्ये अऑक्सिजन बेड उपलब्ध करून देऊ, त्याठिकाणी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा, याकरिता संबंधित ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीबरोबर बोलणे झाले आहे़ तुम्ही केवळ परवानगी द्या, आम्ही सर्व प्रकारच्या मान्यता सादर करतो असा आग्रहच सध्या लावून धरत आहे़ यावर प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुम्हाला ऑक्सिजन पुरवठा मिळविता येत असेल तर, महापालिकेच्या रूग्णालयांनाही द्या अशी विनंती केली़ त्यावेळी मात्र आम्हाला आमच्या भागात सीसीसी उभारायचे आहेत, तुम्ही केवळ परवानगी द्या म्हणून वेळ मारून आपला अट्टहास कायम ठेवला आहे़ यामध्ये केळव माननीयच नाहीत तर विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, भावी नगरसेवक पदासाठी इच्छुक व काही खासगी संस्थाही आहेत़
दरम्यान राज्य शासनाने २४ एप्रिलला परिपत्रक काढून खासगी कोविड केअर सेंटरला परवागनी देताना काही महत्वाचे नियम लादून दिले आहेत़ यामध्ये खासगी सीसीसीमध्ये केवळ सौम्य लक्षणे असलेले रूग्णच ठेवता येतील़ तसेच याठिकाणी जवळचे रूग्णालय संलग्न असले पाहिजे़ सीसीसीमध्ये जुजबी उपचाराशिवाय सतत आॅक्सिजन पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शन आदींव्दारे उपचार करता येणार नाही असेही सांगितले आहे़ तर हे उपचार केवळ रूग्णालयातच करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले आहेत़ सद्यस्थितीला या आदेशाला बांधिल राहून पुणे महापालिका आलेल्या खाजगी कोविड केअर सेंटरला परवागनी देत आहेत़ याचबरोबर सीसीसीला अग्निशामक दलासह अन्य आवश्यक परवाग्याही महापालिकेने बंधनकारक केल्या आहेत़
------------
महापालिकेने सीसीसी वाढविण्याची मागणी
महापालिकेकडून सध्या शहरात ४ ठिकाणी कोविड केअर सेंटर आहेत़ त्यामुळे महापालिकेने प्रत्येक भागात सीसीसी सुरू करून सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना विलग ठेवण्यासाठी सोय करावी अशी मागणी बहुतांशी पक्षांनी व माननीयांनी केली आहे़ परंतु, आहे त्याच चार ठिकाणच्या कोविड केअर सेंटरमध्ये निम्म्या खाटा रिक्त आहेत़
-------------------------------