उपनगरांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ होतानाही दुर्लक्ष का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:48+5:302021-04-14T04:09:48+5:30
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मागील दोन आठवड्यांपासून झपाट्याने वाढली आहे. उपनगरांमध्ये सलग रुग्णवाढ होत असतानाही या भागातील ...
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मागील दोन आठवड्यांपासून झपाट्याने वाढली आहे. उपनगरांमध्ये सलग रुग्णवाढ होत असतानाही या भागातील कोरोना नियंत्रणाकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्ण आढळून आलेल्या भागात ना सॅनिटायझेशन केले जाते, ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. पालिकेने जाहीर केलेल्या ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ असलेल्या इमारती आणि सोसायट्यांच्या गेटवर फलक लावण्या पलीकडे क्षेत्रीय कार्यालयांकडून अन्य कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही.
राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च रोजी आढळून आला होता. सुरुवातीच्या काळात सोसायट्यांमध्ये झालेला संसर्ग झोपडपट्ट्यांमध्ये पसरत गेला. मध्यवस्तीमधून उपनगरांमध्ये हा संसर्ग फैलावत गेला होता. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले होते. परंतु, फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापासून रुग्णवाढ सुरु झाली असून ही दुसरी लाट प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मागील दोन आठवड्यांत झपाट्याने रुग्णवाढ होत गेली आहे. मागील वर्षभरातील सर्वाधिक वाढ 8 एप्रिलला नोंदविली गेली. हडपसर-मुंढवा, नगररस्ता-वडगाव शेरी, सिंहगड रस्ता, धनकवडी-सहकारनगर, कोथरुड-बावधन या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. खबरदारी बाळगण्यात होत असलेली ढिलाई, पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून होत असलेले दुर्लक्ष, व्यापारी आस्थापनांमध्ये धुडकावले जाणारे सुरक्षा नियम यामुळे कोरोनावाढीस हातभार लागत असल्याचे चित्र आहे.
====
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शहरातील ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून येतील त्या भागात निर्जंतुकीकरण केले जात होते. आवश्यक फवारणी केली जात होती. यावेळी मात्र, अशा प्रकारची फवारणी होताना दिसत नाही. तसेच, इमारतींमध्ये सॅनिटायझेशनही केले जात नाही.
====
रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या स्वॅब तपासण्या केल्या जात होत्या. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जात होते. मात्र, कोरोनाच्या दुस-या लाटेत कॉन्टॅक्ट टेसिंगचा फज्जा उडालेला आहे. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण अतिशय कमी आहे.
====
पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले जात आहेत. मात्र, या सोसायट्या, इमारतींबाहेर छोटासा फलक लावण्यापलीकडे काहीही केले जात नाही. पालिका आयुक्तांनी आदेश काढत मायक्रो कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांसाठी निर्बंध लावलेले होते. परंतु, त्याचेही फारसे पालन होताना दिसत नाही. अधिकारी अथवा नेमलेल्या आरोग्य निरीक्षकांनी या भागाची पाहणी करणे आणि कारवाई करणे अपेक्षित आहे.
====
गंभीर रुग्णांत वाढ, खाटा कमी
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यातही गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या आहेत. प्रशासनाकडून खाटा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच, औषधांची उपलब्धता, तपासण्यांची संख्या वाढविणे, लसीकरण वाढविणे यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पालिकेकडे मुळातच मनुष्यबळ कमी असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
====
क्षेत्रीय कार्यालयनिहाय दोन आठवड्यांमध्ये झालेली वाढ
क्षेत्रीय कार्यालय २६ मार्च ते १ एप्रिल २ एप्रिल ते ८ एप्रिल
हडपसर-मुंढवा ३३६२ ५६१९
नगर रस्ता- वडगाव शेरी २८९७ ४१११
सिंहगड रस्ता १९२९ ३२७५
धनकवडी-सहकारनगर २२४९ ३०८४
कोथरुड-बावधन १८०३ ३००२
वारजे-कर्वेनगर १८१० २९०४
औंध-बाणेर १८८५ २६८८
कसबा-विश्रामबाग १६१० २१४४
कोंढवा-येवलेवाडी १६५२ २११९
येरवडा-कळस-धानोरी १२४७ २०८१
बिबवेवाडी १५५६ २००३
वानवडी-रामटेकडी १०३३ १८२३
ढोले पाटील ९४३ १५९८
शिवाजीनगर-घोलेरस्ता १०८८ १५४३
भवानी पेठ ७५३ ९६२