घाटामाथा आणि कोकणातील लोकांचा दुवा असणारी भीमाशंकरची पारंपरिक देवाची होळी उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 03:12 PM2024-03-25T15:12:08+5:302024-03-25T15:12:33+5:30
भीमाशंकरमधील होळी पेटविण्याचा मान येथील लोहकरे कुटुंबाला आहे....
तळेघर (पुणे) : घाटमाथ्यावर राहणारे लोक व कोकण यांना एक धार्मिक धाग्यातून जोडण्याचे काम श्री क्षेत्र भीमाशंकर येथे होळीच्या दिवशी होते. भीमाशंकर येथे घाटमाथ्यावर पारंपरिक देवाची होळी पेटविल्यानंतर सर्व कोकणातील बांधव आपल्या घरच्या समोरील होळ्या पेटवितात, ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकरमधील ब्रह्मवृंद, पुजारी बांधव व ग्रामस्थ एकत्र येऊन पहिली श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराजवळील होळी पेटवितात. यानंतर कळमजादेवीच्या मंदिराजवळील होळी पेटवली जाते व यानंतर लगेचच कोकण कड्यावर जाऊन ब्रह्मवृंद हे पूजा करून वेदपठणाने देवाची होळी पेटविली जाते. ही होळी पेटल्यानंतर कोकणातील नांदगाव, भलिवरे, बेलाचीवाडी, पदरवाडी, भोमळवाडी, खांडस, धानकी, उचल, चापेवाडी, म्हसा, धसई, त्याचप्रमाणे कर्जत तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्व लोक आपली होळी पेटवितात.
हे दृश्य अत्यंत सुंदर व विलोभनीय असते. काही क्षणातच घाटावरून दिसणारा कोकणाच्या अथांग परिसरामध्ये छोटे बल्ब पेटावे, अशा होळ्या पेटतात. कोकणातील लोक होळी पेटविल्यानंतर आपआपले धार्मिक कार्यक्रम करतात. भीमाशंकरमधील होळी पेटविण्याचा मान येथील लोहकरे कुटुंबाला आहे.
भीमाशंकर देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्थ मधुकरशास्त्री गवांदे, प्रसाद गवांदे, आशिष कोडीलकर, ऋषिकेश कोडीलकर, महेश गवांदे यांनी वेदपठण केले. यानंतर, लगेचच कोकणातील होळ्या पेटल्या, हे नयन रम्य दृश्य पाहण्यासाठी पुणे, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, या परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. यावेळी भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड.सुरेश कौदरे, दत्तात्रय कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, गोरख कौदरे, कळमजाई देवस्थान उपाध्यक्ष शांताराम लोहकरे, भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रय हिले, अशोक लोहकरे, बबन लोहकरे, बाळुनाना लोहकरे, नारायण लोहकरे, वामन लोहकरे, काळू लोहकरे, जेठू लोहकरे, काळू लोहकरे, भीमा लोहकरे यावेळी उपस्थित होते.