किरकोळ कारणांवरूनही का उगारला जाताेय काेयता? पुण्यात गुन्हेगारी थांबवण्याचे पोलिसांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:03 IST2025-01-11T14:02:49+5:302025-01-11T14:03:26+5:30

आरोपींना कायद्याचा धाक राहिला नसल्याने तसेच रील्स, चित्रपट बघून भर रस्त्यात अशी कृत्ये करण्याची हिंमत आरोपींमध्ये निर्माण झाली आहे

Why is Koyata being raised even for minor reasons? Challenge to the police to stop crime in Pune | किरकोळ कारणांवरूनही का उगारला जाताेय काेयता? पुण्यात गुन्हेगारी थांबवण्याचे पोलिसांना आव्हान

किरकोळ कारणांवरूनही का उगारला जाताेय काेयता? पुण्यात गुन्हेगारी थांबवण्याचे पोलिसांना आव्हान

पुणे : शहरात किरकोळ कारणावरून भररस्त्यात, शेकडो लोकांसमोर सर्रास कोयत्याने वार होत आहेत. भेकड लोक मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. परिणामी नाहक बळी जात आहे. अशाच एका घटनेत मंगळवारी (दि. ७) एका युवतीला जीव गमवावा लागला. असे प्रकार करणाऱ्यांमध्ये कायद्याची, शिक्षेची अजिबातच भीती राहिली नसल्याचे अधोरेखित होत आहे. पोलिस प्रशासनाकडून अशा घटनांनंतर लगेचच आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाते, मात्र अशी कृत्ये रोखणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रसंग १ 

शहरात एका कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर चार लाख रुपयांसाठी मंगळवारी एकाने कोयत्याने हल्ला करून तिचा खून केला. हा प्रकार सुरू असताना ४० ते ५० लोक केवळ बघ्याच्या भूमिकेत उभे होते, पण कुणीही तिची मदत करण्यासाठी पुढे धजावले नाही. अखेर तरुणीचा मृत्यू झाला.

प्रसंग २ 

मैत्रिणीबद्दल अफवा पसरवल्याच्या कारणावरून ७ ते ८ जणांनी दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना डिसेंबर २०२४ मध्ये सेंट्रल मॉलजवळ घडली हाेती. यावेळी तुंबळ हाणामारीदेखील झाली. त्यात २२ वर्षांचे दोन महाविद्यालयीन तरुण जखमी झाले. ही घटनादेखील दिवसाढवळ्या रस्त्यावर घडत असताना, कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही.

प्रसंग ३ 

वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखवण्यात आल्याची घटना कोंढवा भागात ऑक्टोबर २०२४ मध्ये घडली हाेती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

प्रसंग ४ 

एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून अकरावीत शिकत असलेल्या तरुणीला भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न एप्रिल २०२४ मध्ये घडला हाेता. मात्र येथून जाणाऱ्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुण पळून गेले. पण, त्यांनी जाताना चांगलाच गोंधळ घातला. एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकावले. हा प्रकार सुभाषनगर भागात घडला होता. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यापूर्वी याच परिसरात प्रेमसंबंध संपवल्याच्या कारणातून भरदिवसा कॉलेज तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना सदाशिव पेठेत घडली होती. सुदैवाने ती तरुणी बचावली होती. भरदिवसा रस्त्यावर पेरूगेट पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला होता. त्यानंतरदेखील महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता. अशाच घटनेची पुनरावृत्ती वारंवार होत असल्याचे या घटनांवरून दिसून येते.

ताेडगा काढण्याची मागणी 

आरोपींना कायद्याचा धाक राहिला नसल्याने तसेच रील्स, चित्रपट बघून भर रस्त्यात अशी कृत्ये करण्याची हिंमत आरोपींमध्ये निर्माण झाली आहे. या घटनांमुळे सर्वसामान्य पुणेकर मात्र चिंतित असल्याने यावर लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Why is Koyata being raised even for minor reasons? Challenge to the police to stop crime in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.