हृदयाचा ठाेका का चुकताेय? प्रकृती धडधाकट, नियमित व्यायाम, लक्षणे शून्य; तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 09:59 AM2022-09-23T09:59:03+5:302022-09-23T09:59:15+5:30
तरुण ठरताहेत बळी : अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले
पुणे : हृदयविकाराला कारणीभूत असणारी काेलेस्टेरॉल, धूम्रपान, डायबेटिस, बीपी, आदी काेणतीही लक्षणे नसतानाही हृदयविकाराने मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषकरून याची काेराेना हाेऊन गेलेला २० ते ४० वयाेगटातील तरुण शिकार ठरताना दिसत आहे. हे प्रमाण १५ ते २५ टक्क्यांनी वाढले आहे, असे निरीक्षण पुण्यातील हृदयराेग तज्ज्ञांनी नाेंदवले आहे.
गेली दाेन वर्षे काेराेनाचा प्रादुर्भाव माेठ्या प्रमाणावर हाेता. आता हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, तरुणांमधील हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. यामागे रक्त घट्ट हाेणे हे प्रमुख कारण असल्याचे हृदयराेगतज्ज्ञ सांगत आहेत. त्याचबराेबर इतरही घटक जे अद्याप समाेर आलेले नाहीत, तेही कारणीभूत असू शकतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
काेराेना आणि हृदयविकार विकाराचा संबंध काय?
- बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या हृदयराेग विभागाचे सहयाेगी प्राध्यापक डाॅ. हेमंत काेकणे म्हणाले, ‘सध्या २५ ते ४० वयाेगटांतील तरुणांमध्ये हृदयविकाराचा धक्का येण्याचे प्रमाण काेविडच्या आधीच्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे या तरुणांना हृदयराेगाचे जाेखमीचे घटक नसतानाही ही समस्या दिसून येत आहे.’
- ससून रुग्णालयात दरराेज हृदयविकाराचे ४ ते ५ तरुण रुग्ण येतात व त्यांपैकी ९० टक्के रुग्णांना काेराेनाचा इतिहास आहे. तरुण वयात हृदयविकाराचे प्रमाण का वाढले, हे अद्याप निश्चित झाले नसले तरी काेराेना आणि हृदयविकार यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे.
''काेराेना व हृदयविकार यांच्यात थेट संबंध अद्याप प्रस्थापित झाला नसून त्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर संशाेधन सुरू आहे. काेराेनामुळे हृदयराेगात वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. पण, तसा संबंध अद्याप संशाेधनाद्वारे प्रस्थापित झालेला नाही. काेराेनात रक्त गाेठू शकते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गाेठले जात असल्याने हृदयविकाराचे प्रमाण वाढू शकते. परंतु, याबाबत अद्याप संशाेधन सुरू आहे. आधीही तरुणांमध्ये हृदयराेग दिसून येत हाेता तसा ताे आताही दिसून येत आहे. त्यामुळे काेराेनामुळेच आहे, असे म्हणता येत नाही. - डाॅ. आनंद नाडकर्णी, वरिष्ठ हृदयराेग तज्ज्ञ''