‘महाज्योती’च्या परीक्षेत सलग दाेन वेळा गाेंधळ हाेऊनही कारवाई का नाही? विद्यार्थ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 10:01 AM2023-08-02T10:01:23+5:302023-08-02T10:01:51+5:30
परीक्षेत सलग दाेन वेळा गाेंधळ हाेऊनही संस्थेवर कारवाई का नाही? अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे....
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्याेती) मार्फत एमपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेली प्रवेश परीक्षा पुन्हा वादात सापडली आहे. तत्पूर्वी यूपीएससी पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षा गैरप्रकारांमुळे रद्द केली होती. दि. ३० जुलै रोजी झालेल्या प्रवेश परीक्षेत एका खासगी क्लासेसच्या टेस्ट सिरीज प्रश्नपत्रिकेतून अनेक प्रश्न आल्याच्या तक्रारी विद्यार्थांनी महाज्याेतीकडे केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘महाज्योती’ने संस्थेला परीक्षा घेण्याचे काम काढून घेण्याबाबत कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे. परीक्षेत सलग दाेन वेळा गाेंधळ हाेऊनही संस्थेवर कारवाई का नाही? अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कोठून घेण्यात आले? पुस्तकाचे नाव, संबंधित पृष्ठ क्रमांक यांची छायांकित प्रमाणित प्रत आदी माहितीबाबत महाज्योतीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे यांनी वुईशाईन टेक प्रा. लि. बावधन, पुणे या संस्थेकडून खुलासा मागविला हाेता. मात्र, संस्थेने काेणतेही उत्तर दिले नाही.
महाज्याेतीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी मंगळवारी (दि. १) संबंधित संस्थेला कारणे दाखवा नाेटीस पाठविली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी महाज्याेती कार्यालयाकडे सादर केलेले पुरावे विचारात घेता परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करताना संस्थेने उचित मानदंडाचे पालन केले नसल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे, तसेच दि. १६ जुलै राेजी घेण्यात आलेल्या लाेकसेवा आयाेगाच्या पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षेमध्ये काॅपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर संस्थेने याेग्य ती कारवाई न केल्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्याची बाब उद्भवली आहे.
दि. ३० जुलै राेजी पार पडलेली एमपीएससी पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय का घेण्यात येऊ नये? आपल्याला दिलेला कार्यादेश रद्द करून आपल्याकडून परीक्षा घेण्याचे काम का काढून घेण्यात येऊ नये? तसेच आपल्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे आणि संस्थेचे नाव काळ्या यादीत समाविष्ट का करू नये? याबाबत तत्काळ खुलासा सादर करावा, असे नमूद केले आहे.