वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई का नाही? सरकारची भूमिका संशयास्पद, सुप्रिया सुळेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:35 IST2025-01-15T19:34:40+5:302025-01-15T19:35:02+5:30
सुरेश धस भाजपचे आहेत का? वाल्मीक कराड कोणाच्या जवळचा आहे? असे राजकारणाशी संबधित विषय यात आणायचे नाहीत

वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई का नाही? सरकारची भूमिका संशयास्पद, सुप्रिया सुळेंचा आरोप
पुणे : बीडमधील मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पुण्यात बोलताना केला. या गुन्हेगारी प्रकरणातील सर्व गोष्टी पोलिसांशी संबधित आहेत व हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, असे म्हणत त्यांना वाल्मीक कराडवर ईडी का नाही लावली? असा प्रश्न केला.
सुळे विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पुण्यात आल्या होत्या. त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण कंपनी आदी ठिकाणी बैठका घेतल्या. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. या हत्येत प्रमुख आरोपी आहे तो पोलिसांना सापडत नाही. यात खंडणीचा गुन्हा आहे. मग त्यात पोलिसांनी नक्की काय केले? यातील आरोपींचा मोबाइल गायब आहे, असे पोलिस सांगतात. मग त्याचा फोन कॉलचा तपशील का तपासला जात नाही? असे अनेक प्रश्न विचारत खासदार सुळे यांनी सरकारवरच अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त केला.
या प्रकरणात अनेकजण बोलत आहेत. मात्र, मला यात कसलेही राजकारण आणायचे नाही. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून बोलत आहे. सुरेश धस भाजपचे आहेत का? वाल्मीक कराड कोणाच्या जवळचा आहे? असे राजकारणाशी संबधित विषय यात आणायचे नाहीत. हो गुन्हा आहे, त्याचा संबंध पोलिसांशी येतो. पोलिस खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे त्यांनीच यात बोलावे, असेही त्या म्हणाल्या. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनीच परस्परांशी बोलावे. महाराष्ट्रात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करावा, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे. त्याचा विचार व्हावा, माणुसकीला प्राधान्य द्यावे, पीडित कुटुंबांना आधार द्यावे, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली.
वाल्मीक कराड याच्याकडून बारामतीमध्ये काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याचे बोलले जात आहे. बारामतीमध्ये गेल्यानंतर यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांबरोबर नक्की बोलणार आहे. कोणावर काही अन्याय झाला असेल तर त्याचे निराकरण करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे, असे सुळे यांनी सांगितले.