वाचाळवीर अमोल मिटकरींची कसबा पेठेत सभा का नाही, भाजपचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:38 PM2023-02-22T12:38:40+5:302023-02-22T12:39:38+5:30
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी गायब असल्याने भाजपने टोला लगावला आहे.
पुणे - कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात सर्वच पक्षांतील नेत्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत. रोजच्या जगण्यातील प्रश्नांवर मात्र कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे मतदार पुरते गोंधळात पडले आहेत. मातब्बर नेतेमंडळींची उपस्थिती पाहून आपल्या मतदारसंघात पोटनिवडणूक होते आहे की, सार्वत्रिक निवडणूक, असा प्रश्न त्यांना पडला आहे. येथील निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी गायब असल्याने भाजपने टोला लगावला आहे.
कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अन्य पक्ष यांची महाविकास आघाडी विरूद्ध भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना व त्यांचे सहकारी पक्ष यांची महायुती अशी दुरंगी लढत येथे होत आहे. पोटनिवडणुकीत भली मोठी फौज उतरली जात आहे. मंगळवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही अजित पवारांसोबत रोड शो केला. तर, बाळासाहेब थोरात हेही प्रचाराला आले होते. पण, येथील निवडणूक प्रचारात अमोल मिटकरींना राष्ट्रवादीने दूर ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजाने मिटकरींबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. म्हणूनच, राष्ट्रवादीने ही भूमिका घेतल्याचं भाजपने म्हटलंय.
पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत अमोल मिटकरी यांना प्रचारा बाहेर का ठेवले? असा सवाल भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. जे मिटकरी सतत ब्राह्मणांचा गरळ ओकली, ते द्वेष करतात, त्यांना शिव्या घालतात त्या मिटकरींची जाहीर सभा राष्ट्रवादी पक्ष का घेत नाही? असा प्रश्न कुलकर्णीं यांनी राष्ट्रवादीला विचारला आहे. अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत, पण मिटकरीची सभा ना पिंपरीत होतेय, ना कसब्यात होतेय. कारण, मिटकरीला प्रचाराला पाठवलं तर याचे परिणाम राष्ट्रवादीला भोगावे लागतील, हे पक्षाला माहितीय, असेही कुलकर्णी यांनी म्हटले.
विरोधी पक्षनेत्यांचा रोड शो
महाविकास आघाडीनेही माजी महसूल मंत्र्यांसह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, वेगवेगळ्या खात्यांचे माजी मंत्री यांच्याबरोबर विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनाही सक्रिय केले आहे. त्यांचेही काही आमदार ठाण मांडून आहेत. मतदारसंघातील प्रचारफेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी तर रोड शोही केला.