पुण्यातील कोयता गँगवर पोलिसांकडून कारवाई का नाही? अजित पवारांचा विधानसभेत सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:17 PM2022-12-21T13:17:53+5:302022-12-21T13:19:45+5:30
पुण्यातील मांजरी परिसरात कोयता गँगची दहशत...
हडपसर (पुणे) : मांजरी येथील ग्रामस्थांचा आवाज थेट विधानसभेत पोहोचला. येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून कोयत्या गॅंगपासून त्रास होत होता. त्यावर हडपसरपोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणीही केली होती. याबाबत अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न मांडून कोयता गॅंगच्या दहशतीपासून मुक्तता मिळावी, अशी मागणी विधानसभेत केली आहे.
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोयता गॅंगचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्याला ''कोयता गँग''च्या दहशतीतून मुक्त करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. हडपसर उपनगर व शहरातील काही भागात वावरणाऱ्या ''कोयता गँग''ला मोक्का लावा, तडीपार करा, कोणत्याही परिस्थितीत दहशत मोडून काढा, असेही अजित पवारांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी या कोयता गँगच्या दहशतीला वैतागून मांजरी ग्रामस्थांनी हडपसर पोलिस स्टेशन येथे मोर्चा काढला होता. याची दखल विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली.
हडपसर व शहरांच्या आसपास असणाऱ्या उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता घेऊन फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लूटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारख्या हिंसक कारवाया करते. राज्यातील अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत.
अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, पुणे शहर व आसपासच्या उपनगरात ''कोयता गँग''ची दहशत आहे. पुणे परिसरातल्या मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, मांजरी - मुंढवा रस्ता, हडपसर भागात कोयता गॅंगच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.
याबाबत मांजरी ग्रामस्थांनी मोर्चासुद्धा काढला होता. लोकमतने याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली. हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली होती. याचाही उल्लेख विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभेतील आपल्या भाषणात केला.
कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी, त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा, त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी सभागृहात केली.