पती-पत्नीच्या सुंदर नात्यात हिंसा का वाढतेय?
By नम्रता फडणीस | Updated: December 4, 2024 10:27 IST2024-12-04T10:26:42+5:302024-12-04T10:27:50+5:30
गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पती-पत्नीच्या सुंदर नात्यात हिंसा का वाढतेय?
पुणे : पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले आणि त्याचा राग पत्नीला आला. त्यानंतर तिने चक्क पतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लाटणे, मिक्सरच्या भांड्याने मारहाण केली, नखांनी जोरात ओरखडले, पतीच्या उजव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन दुखापत केली. अखेर पतीला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आणि समर्थ पोलिस स्टेशनमध्ये पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही रविवारी (दि. १) घडलेली ताजी घटना आहे.
गेल्या काही वर्षांत घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत असून, किरकोळ कारणांवरून पती-पत्नींमध्ये होणारे वाद इतके विकोपाला जात आहेत की याचे पर्यवसान हाणामारी आणि अगदी खून करण्यामध्ये होत आहे. ही नात्यातील वाढती हिंसा एक चिंतेची बाब बनली असून, पती-पत्नीच्या सुंदर नात्यात इतकी हिंसकता येतेच कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एक काळ असा होता की, पुरुषी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा स्वत:चे नैराश्य, अपयश लपविण्यासाठी पती आपल्या पत्नीवर हात उगारत असे. दुर्दैव म्हणजे कुटुंबातील सदस्यांना यात वावगे काहीच वाटत नव्हते. कुणी पुरुषाला अडविण्याचा प्रयत्नही करीत नव्हता. अजूनही ही स्थिती फारशी बदललेली नाही. मात्र, आता एकविसाव्या शतकात सबला पत्नीकडूनदेखील क्षुल्लक कारणावरून मागचापुढचा विचार न करता पतीला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, विवाहबाह्य संबंधातून खून करणे असे प्रकार वाढत आहेत.
दोन वर्षांपूर्वी पती गिफ्ट देत नाही, फिरायला नेत नाही म्हणून पत्नीने पतीच्या नाकावर ठोसा मारून त्याला घायाळ केल्याची घटना गाजली होती. दोन दिवसांपूर्वीच उत्तमनगरमध्ये पत्नीने न सांगता रिक्षाचे हप्ते भरले म्हणून पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना घडली. त्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी एकमेकांसमवेत आयुष्य घालविण्याची स्वप्न रंगवली तेच एकमेकांना दुखापत करायलादेखील मागेपुढे पाहत नाहीत, ही नात्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. यावर विचारमंथन होण्याची गरज आहे. अन्यथा विवाह संस्था मोडकळीस येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
लग्न, संसार म्हणजे काय? याच गोष्टी आता पती-पत्नी विसरत चालले आहेत. मी, माझं आणि मला इतकंच त्यांचं नातं व्यावहारिक झालं आहे. मोबाइलमुळे निर्माण झालेल्या विसंवादाचा परिणाम लहान मुलांना भोगावा लागत आहे. पूर्वी कुटुंबातील सदस्य एकत्रित बसून चहा पित असत. आता चहा पितानाही हातात मोबाइल असतो अशी स्थिती आहे. पती-पत्नीमध्ये भावनिकता राहिलेली नाही. - संगीता जाधव, पोलिस निरीक्षक, भरोसा सेल
अनेकदा पती-पत्नीच्या नात्यात संवादाचा अभाव, विश्वासाचा तुटलेला धागा आणि ताणतणाव यामुळे टोकाच्या घटना घडतात. त्यामागे मानसिक ताण, चिडचिड, किंवा नैराश्य यांचा मोठा वाटा असतो. "बायका पुरुषांना मारत नाहीत" हे सार्वकालिक सत्य मानणे चुकीचे आहे, कारण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये महिलाही आक्रमक होऊ शकतात. भारतात महिलांसाठी अनेक संरक्षणात्मक कायदे आहेत, जसे घटनेतील कलम 498 अ (कौटुंबिक हिंसेविरुद्ध संरक्षण); परंतु पुरुषांसाठी अशा प्रकारच्या संरक्षणात्मक तरतुदी फारशा उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात महिलांकडून असे प्रकार घडतात - ॲड. राणी माणिक सोनावणे, उच्च न्यायालय नियुक्त मध्यस्थ आणि चेअरमन, पुणे लाॅयर्स कन्झ्युमर सोसायटी