महिलांवरील हिंसाचाराबाबत गप्प का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 05:57 AM2019-12-15T05:57:42+5:302019-12-15T05:57:53+5:30
फ्लेव्हिया अॅग्नेस; अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
पुणे : बलात्काऱ्यांना फाशी देऊन, एन्काउंटर करून पीडितेला तात्काळ न्याय देण्याची मागणी केली जाते. पण महिलांवर दररोज होत असलेल्या अत्याचाराविरोधात कोणीच बोलत नाही. महिला हिंसाचारविरोधात असलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणीच पुढे येत नाही. त्यासाठी लढा उभारण्याचे स्वयंसेवी संस्थांचे काम नाही. शासनासह प्रत्येकाने यामध्ये सक्रियता दाखवायला हवी, अशी अपेक्षा महिलांच्या हक्कांसाठी लढणाºया सामाजिक कार्यकर्त्या फ्लेव्हिया अॅग्नेस यांनी व्यक्त केली.
‘द इंटरनॅशनल लाँजिव्हिटी सेंटर इंडिया’(आयएलसीआय) यांच्या वतीने शनिवारी अॅग्नेस यांना पहिल्या अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, ‘आयएलसीआय’चे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व चेअरमन जयंत उमराणीकर, कार्यकारी संचालिका अंजली राजे आदी उपस्थित होते. याप्रसंगी कै. श्री. बी. जी. देशमुख पुरस्काराने मिरज येथील आधार ज्येष्ठ नागरिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ डीएसके विश्व पुणे, आणि रत्नागिरी येथील कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा गौरव करण्यात आला. तर वर्धा येथील डॉ. नामदेवराव बेहरे, बारामती येथील डॉ. पांडुरंग बोराटे आणि पुण्यातील डॉ. प्रमोद मोघे यांना कै. श्री. बी.जी. देशमुख जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
अॅग्नेस म्हणाल्या, हुंडाबळी, बलात्कार, गर्भपात यांसह महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना पुढे येत आहेत. हैदराबाद येथे बलात्कार करून तरूणीला जाळण्यात आले. या प्रकरणात आरोपींचे एन्काउंटर करण्यात आले. असाच तात्काळ न्याय लोकांना हवा आहे. पण फिर्याद नोंदविताना ठेवलेल्या त्रुटी, न्यायदानात होणारा विलंब, आरोपीच्या वकिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पीडितेची होणारी घुसमट याविषयी बोलले जात नाही. हे मुद्दे संघटनेच्या पातळीवर उचलून धरण्यात आले. त्यामध्ये यशही मिळत आहे. त्या कामाचा सन्मान होत असल्याने समाधान वाटते.
‘इंटरनॅशनल लॉन्जिव्हिटी सेंटर-इंडिया (आयएलसी-आय) या संस्थेचे पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आले. यात महिला अधिकारांसंदर्भात काम करणाºया कार्यकर्त्या फ्लॅव्हिया अॅग्नेस यांना ‘अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कारा’ने जयंत उमराणीकर, डॉ. के. एच. संचेती, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.